Death Anniversary of Indira Gandhi: ३१ डिसेंबर १९८४ या दिवशी इंदिरा गांधी या आपल्या ठरलेल्या नियोजित कार्यक्रमासाठी घराबाहेर पडल्या. त्यावेळी त्यांच्या बरोबर सतवंत सिंग आणि बियांत सिंग हे दोन अंगरक्षक होते. या अंगरक्षकांनीच इंदिरा गांधींवर गोळ्या झाडल्या. यानंतर इंदिरा गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्यावेळी पी. वेणुगोपाल हे डॉक्टर होते. त्यांनी त्यादिवशी रुग्णालयात आणि ऑपरेशन थिएटरमध्ये काय घडलं ते सांगितलं आहे. एम्सचे प्रमुख आणि देशाच्या पंतप्रधानांचे डॉक्टर म्हणून पी वेणुगोपाल प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या ‘हार्टफेल्ट’ या पुस्तकात ३१ ऑक्टोबर १९८४ चा थरारक अनुभव लिहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. वेणुगोपाल यांनी काय लिहिलं आहे पुस्तकात?

‘३१ ऑक्टोबर १९८४ हा दिवस माझ्यासाठी नेहमीसारखाच सामान्य होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मला एका ज्युनिअरने येऊन सांगितलं की पंतप्रधान इंदिरा गांधींना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात गोंधळ सुरु झाला होता. इंदिरा गांधी यांचे सहकारी आर. के. धवन आणि माखनलाल फोतेदार हे रडत होते. मी इंदिरा गांधींना पाहिलं तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यातच दिसल्या. त्यांचा चेहरा फिकट पडला होता. ते दृश्य पाहून मी घाबरलो होतो. त्यांच्या शरीरात रक्त चढवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले. मात्र त्यांचा रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होत होता. मी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याचा आदेश दिला. एका क्षणी मी मागे वळून पाहिलं आणि माझ्या स्वतःच्या रक्ताळलेल्या पायाचे ठसे मला दिसले.’ असं वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे.

इंदिरा गांधी यांच्या शरीरात ३० गोळ्या

आपल्या पुस्तकात डॉ. वेणुगोपाल पुढे म्हणतात, ‘इंदिरा गांधींवर ३३ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३० गोळ्या त्यांच्या शरीरात होत्या. काही गोळ्या त्यांच्या शरीरातून आरपार गेल्या होत्या तर काही शरीरातच राहिल्या होत्या. मारेकऱ्यांनी इंदिरा गांधींवर मशीन गन मधून अनेक फैरी झाडल्या. इंदिरा गांधी यांना वाचवावं हे कुणाला सुचलं नसावं. कारण तसं झालं असतं तर सुरुवातीच्याच गोळ्या त्यांना लागल्या असत्या आणि कदाचित त्या वाचल्या असत्या. मात्र त्यावेळी मला निर्णय घेणं भाग होतं. इंदिरा गांधी यांना बायपास मशीनवर ठेवून त्यांचा रक्तस्रावर थांबवायचा आणि महाधमनी जोडायची असं ठरवलं. मी चार तास त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो. त्या चार तासात तीनवेळा कपडे बदलावे लागले होते. कारण प्रत्येकवेळी अंगावरचे कपडे रक्ताने भिजत होते. दुपारी दोनच्या सुमारास आम्ही इंदिरा गांधी यांना बायपास मशीनवरुन काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही.’

इंदिरा गांधींच्या निधनानंतर रुग्णालयाच्या खोलीत काय घडलं?

पुढे डॉ. वेणुगोपाल लिहितात, ‘पुढील काही तास हॉस्पिटलमधल्या त्या खोलीत चर्चा, वादविवाद सुरू होते. देशाच्या पूर्वेकडील भागात दौऱ्यावर असणारे राजीव गांधी परतीच्या मार्गावर होते आणि त्यांच्या येण्याची वाट पाहण्यावर त्या खोलीत असणाऱ्यांचे एकमत झाले होते.. माझ्या कानावर जे संभाषण पडले त्यातून मला समजले ते असे की राजीव गांधी यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यास राष्ट्रपती तयार होतील का? ही चिंता उपस्थितांना वाटत होती. अरुण नेहरूंचा मुद्दा होता की, परदेश दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींची जबाबदारी सांभाळणाऱ्या उपराष्ट्रपतींकडे ही जबाबदारी सोपवता येईल का? सर्वसाधारण मत असे होते की राष्ट्रपती मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्याला बोलावून त्याच्यावर जबाबदारी सोपवतील. संध्याकाळनंतर राष्ट्रपती झैलसिंग आले. एरवी निर्विकार दिसणारे झैलसिंग त्या संध्याकाळी खूप गोंधळलेले दिसत होते.

राजीव गांधी यांचा चेहरा फिक्कट पडला होता

‘राजीव गांधी दुपारी कधीतरी आले. त्यांचा चेहरा फिकुटला होता. ते थेट विमानतळावरून आले होते. अशा अवस्थेत असलेल्या आपल्या आईकडे पाहून दुसऱ्याच क्षणी ते बाहेर निघून गेले, तेव्हा ते आपल्या भावना आवरण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, असे माझ्या लक्षात आले. यानंतर, आमच्या चमूचे काम सुरू झाले. पुढील गोष्टींसाठी इंदिरा गांधींचा मृतदेह तीन दिवस तरी टिकवून ठेवायचा होता. त्यामुळे एम्बामिंगचे (मृतदेह पुढील काही काळ टिकवण्यासाठी रसायने वापरण्याचे) काम सुरू झाले.’ असं वेणुगोपाल यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I saw indira gandhi in a pool of blood and dr p venugopal recounts that thrilling experience in his book scj