IAS Officer slaps student repeatedly during exam Video : एक सरकारी अधिकारी एका विद्यार्थ्याला परीक्षा सुरू असताना पकडून जबरदस्त मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा प्रकार मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्यात घडला. हा व्हिडीओ १ एप्रिलचा असून आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत असलेले अधिकारी भिंड जिल्ह्याचे जिल्हा न्यायदंडाधिकारी संजीव श्रीवास्तव हे आहेत आणि हा प्रकार दीनदयाल डांगरोलिया महाविद्यालयात बीएससी द्वितीय वर्षाच्या गणिताच्या परीक्षेदरम्यान घडला.

या व्हिडीओमध्ये श्रीवास्तव हे हातात पेपर घेऊन या विद्यार्थ्याला जाब विचारताना दिसत आहेत. त्यानंतर ते त्याला खूर्चीवरून खेचून उभे करताना आणि त्याला लागोपाठ चापटा मारताना दिसत आहेत. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ते त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या एका रुममध्ये घेऊन जाताना दिसत आहेत. ही खोली स्टाफ रूम सारखी दिसत आहे. त्यानंतरविद्यार्थ्याकडे इशा करत अधिकारी पेपर दुसर्‍या एका व्यक्तीला सोपवताना दिसत आहेत. ही मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव रोहित राठोड असल्याचे सांगितले जात आहे.

त्यानंतर श्रीवास्तव त्या विद्यार्थ्याला विचारतात, “तुझा पेपर कुठं आहे?” आणि त्यानंतर दोन चापटा लगावतात.

रोहित राठोड याने आरोप केला की मारहाणीमुळे त्यांच्या कानावर परिणाम झाला आहे. “ते आयएएस अधिकारी असल्याने मी काहीही बोलू शकत नाही,” असेही म्हणाले.

पण संजीव श्रीवास्तव यांनी त्यांनी केलेल्या मारहाणीचा बचाव केला आहे. एनडीटीव्हीशी बोलताना ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात कॉपी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी आरोप केला की काही विद्यार्थी प्रश्नपत्रिका बाहेर घेऊन गेले होते, त्याची उत्तरे सोडवली आणि सोडवलेली उत्तरपत्रिका आत घेऊन येत होते.

“मी एका संघटित चिटींग रॅकेटची चौकशी करण्यासाठी तिथे गेलो होतो. भविष्यात महाविद्यालयाचा वापर परीक्षा केंद्र म्हणून करू नये अशी शिफारस मी विद्यापीठाला पत्र लिहून केली आहे,” असे श्रीवास्तव म्हणाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कॉलेज मध्यप्रदेशमधील विरोधी पक्षचे उपनेते हेमंत कतारे यांच्या सासरे नारायण डांगरोलिया यांचे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आधीही अनेक वाद

जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव हे वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वालेर खंडपीठाने, सार्वजिनिक बांधकाम विभागाच्या एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान श्रीवास्तव यांच्या वर्तणुकीबद्दल भाष्य केले होते. “अशा अधिकाऱ्याने फिल्डवर काम करावे की नाही हे मुख्य सचिवांनी ठरवावे,” असे न्यायालयाने म्हटले होते.

इतकेच नाही तर सध्या भिंडमध्ये तैनात असलेल्या तहसीलदार माला शर्मा यांनी नुकतेच जिल्हाधिकारी श्रीवास्तव आणि एसडीएम पराग जैन यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी, “या छळामुळे मला काही झाले तर त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव आणि गोहाड एसडीएम पराग जैन यांची असेल,” असे म्हटले आहे.