सलामीवीर रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषक स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. भारताने आफ्रिकेवर ६ गडी राखून मात केली. २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने नाबाद १२२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. महेंद्रसिंह धोनीच्या सोबतीने रोहितने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याच्या या खेळीचं कर्णधार विराट कोहलीनेही कौतुक केलंय. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

“माझ्या मते रोहित शर्माची वन-डे क्रिकेटमधली आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी होती. कारण विश्वचषकासारख्या स्पर्धेत पहिला सामना खेळताना तुमच्यावर थोडासा दबाव हा असतोच. ज्यावेळी तुम्ही फलंदाजीसाठी उतरता आणि एखाद दुसरा चेंडू अनपेक्षित उसळी घेतो तेव्हा शांत चित्ताने फलंदाजी करणं ही सोपी गोष्ट नाहीये. अशावेळी फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या मोहात पडतो. मात्र रोहितने संयमीपणे खेळ करत डावाला आकार दिला, आणि त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूकडून आम्हाला अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.”

दरम्यान, २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन स्वस्तात माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची छोटेखानी भागीदारी झाली. विराट कोहली फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि रोहितने पुन्हा एकदा भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.

लोकेश राहुल रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर रोहित शर्माने महेंद्रसिंह धोनीच्या साथीने आपलं शतक साजरं करत भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना धोनी झेलबाद झाला. यानंतर रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. नाबाद शतकी खेळीसाठी रोहित शर्माला सामनावीर किताब देऊन गौरवण्यात आलं.

अवश्य वाचा – Cricket World Cup 2019 : भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’ला मागे टाकत रोहित शर्माचा भीमपराक्रम !