रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जोडी गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाची एकदिवसीय क्रिकेटमधील यशस्वी जोडी म्हणून उदयास येत आहे. या दोघांची मैदानावरील मैत्री साऱ्यांना परिचित आहे, तसेच मैदानाबाहेरील या दोघांच्या मैत्रीचेही अनेक किस्से खूपदा या दोघांनी सांगितले आहेत. पण नुकतंच एका व्हिडीओ मुलाखतीत रोहित शर्माने शिखर धवनला चक्क चक्क अस्वच्छ आणि घाणेरडा खेळाडू असल्याचं म्हंटलं आहे.

रोहित शर्मा, शिखर धवन आणि संपूर्ण टीम इंडिया विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये आहे. तेथे ते बराच काळ वास्तव्यास असणार आहेत. त्यामुळे त्यांना विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंत एकमेकांसोबत राहायचे आहे. त्यामुळे त्यांना एकमेकांबद्दल आलेले अनुभव शेअर करण्याच्या उद्देशाने रोहित शर्माला काही प्रश्न विचारण्यात आले. ICC ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने शिखर धवन हा अत्यंत घाणेरडा आणि अस्वच्छ असा खेळाडू आणि रूममेट असल्याचे सांगितले आहे.

या बरोबरच अनेक भन्नाट प्रश्नांची रोहितने झकासपैकी उत्तरं दिली असून सारखा हातात फोन घेऊन बसणारा खेळाडू कोण या प्रश्नाला त्याने कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांचे नाव घेतले आहे. याशिवाय सेल्फी आवडणारा खेळाडू, अत्यंत वाईट डान्सर, गुगलवर स्वतःचेच नाव सर्च करणारा आणि कायम मोबाईलवर असणारा या सर्व प्रश्नांचे उत्तर त्याने हार्दिक पांड्या असेच दिले. तर संघाच्या बसमध्ये उशिरा कोण येतं? यावर उशीर करणारी व्यक्ती ही संघातील नसून आमचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर हे बसमध्ये उशिरा पोहोचतात, असे त्याने सांगितले.

दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या सराव सामन्यात वाईट कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने केवळ १८० धावा केल्या. हे आव्हान न्यूझीलंडच्या संघाने सहज पूर्ण केले.