‘जर जीएसटीच्या रचनेत बदल व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर आम्ही सत्तेत आल्यास आम्ही यात निश्चित बदल करु’ असे आश्वासन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातच्या जनतेला दिले आहे. सुरत येथे विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

उपस्थित व्यावसायिकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, ‘जर आम्ही देशात सत्तेत आलो तर, एक असा जीएसटी घेऊन येऊ, ज्यामध्ये तुमचा फायदा असेल. तुम्हाला ज्या प्रकारे वाटतंय त्याप्रमाणे आम्ही काम करु. तुमचे म्हणणे आम्ही निश्चित ऐकून घेऊ.’

सुरतमधील सभेपूर्वी नवसारीत एका प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोटाबंदीच्या निर्णयावरुन निशाना साधला यावेळी ते म्हणाले की, ‘सर्व पैसा हा काळा पैसा नसतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजत नाहीए. ज्या काळ्या पैशाला ते गरीब लोकांच्या खिशात तपासत आहेत. तो काळा पैसा परदेशी बँकांच्या खात्यामध्ये जमा आहे.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांना रोजगार पुरवण्यात असमर्थ ठरल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. ते म्हणाले, एका वर्षात केवळ एक लाख नोकऱ्यांच्या संधीच निर्माण होऊ शकल्या आहेत. मात्र, प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुनही राहुल गांधींनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, संपूर्ण देशात पेट्रोल आणि डेझेलच्या किंमतींत घट होत असताना भारतातच इंधनाच्या किंमती सतत का वाढत आहेत? हे अद्याप मला उमगलेले नाही.