Shivraj Singh Chouhan on US Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अतिरिक्त २५ टक्के टॅरिफची आजपासून अंमलबजावणी होणार असून आता भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लागू होईल. ट्रम्प अतिरिक्त टॅरिफची घोषणा कालपर्यंत मागे घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी त्यावर कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. यानंतर आता भारत सरकारकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अमेरिकेच्या दबावाला प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले, “जर आम्ही आमचा तिसरा डोळा उघडला तर आम्हाला धमकवू पाहणाऱ्यांचा टिकाव लागणार नाही.” ग्वाल्हेर येथे झालेल्या ६४ व्या अखिल भारतीय गहू आणि बार्ली संशोधन कामगार परिषदेत ते बोलत होते. टॅरिफ वाढीचा फटका शेतकऱ्यांना बसू देणार नाही, तसेच शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले, “मित्रांनो, मीही एक शेतकरी आहे. या नात्यने माझे अंतरमन मी सांगत आहे. आपले पंतप्रधान यांनी ठणकावून सांगितले की, जगातला कितीही मोठा दादा काहीही करत असला तरी आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करू देणार नाही.” राष्ट्रीय हित किंवा शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

आम्ही आमचा तिसरा डोळा उघडला तर…

भारतीय नागरिकांनी आता भारतात तयार झालेल्या उत्पादनांचा वापर वाढवायला हवा, असे सांगताना चौहान म्हणाले की, आपल्या दैनंदिन जीवनात आपण स्वदेशी वस्तू वापरण्याचा संकल्प केला पाहिजे. आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूच आपण विकत घेतल्या पाहिजेत. आपल्यावर काही लोक दादागिरी करत आहेत. जर आम्ही आमचा तिसरा डोळा उघडला तर दादागिरी करणाऱ्यांचा टिकाव लागणार नाही.

भारत आता वेगाने प्रगती करत आहे. भारत आता निर्भयपणे बोलू शकतो आणि तो कुणासमोरही झुकणार नाही. १४४ कोटी लोकसंख्येचा हा देश संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. आपण सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करतो. पण याचा अर्थ असा नाही की, आपण कुणासमोरही झुकू किंवा दाबले जाऊ, असेही चौहान म्हणाले.