अभिनय हरगोविंद, एक्स्प्रेस वृत्त
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या १७ शिक्षणसंस्थांचा प्रशासकीय कारभार हंगामी स्वरुपात नेमलेल्या किंवा मुदतोत्तर कार्यरत असलेल्या कुलगुरू आणि संचालकांमार्फत सुरू आहे. विद्यामान कुलगुरूची मुदत संपण्यापूर्वी सहा महिने आधी नव्या पदाधिकाऱ्याची निवड करणे अपेक्षित असताना केंद्र सरकारलाच योग्य उमेदवार मिळत नसल्याची स्थिती या शिक्षणसंस्थांमध्ये दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित जवळपास १३० बहुप्रतिष्ठित उच्च शिक्षण संस्था आहेत. यात ४८ केंद्रीय विद्यापीठे, २३ आयआयटी, २१ आयआयएम, ३१‘‘एनआयटी’ आणि सात ‘आयआयएसईआर’ यांचा समावेश आहे. या सर्व शिक्षणसंस्थांची ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने पाहणी केली असता आठ केंद्रीय विद्यापीठे, तीन आयआयएम, दोन आयआयटी, तीन एनआयटी आणि एक आयआयएसईआर या संस्थांमध्ये प्रभारी प्रमुख असल्याचे आढळून आले. यापैकी आठहून अधिक संस्थांचा कारभार एका वर्षाहून अधिक काळ हंगामी व्यक्तीकडे आहे. त्यात आयआयए कलकत्ता, आयआयएम काशीपूर, आयआयएम शिलाँग, आयआयटी खरगपूर, आयआयटी हैद्राबाद, एनआयटी श्रीनगर, एनआयटी उत्तराखंड आणि एनआयटी आंध्र प्रदेश या संस्थांचा समावेश आहे. बनारस हिंदू विद्यापीठ, इग्नो, सिक्कीम विद्यापीठ या संस्थांमध्येही प्रभारी व्यक्तीच प्रशासन चालवत असल्याचे दिसून आले आहे.

विद्यामान कुलगुरू किंवा संचालकाची मुदत पूर्ण होण्याच्या सहा महिने आधी उत्तराधिकाऱ्याची निवडप्रक्रिया राबवली जावी, असा दंडक आहे. मात्र, असे होताना दिसत नाही. संसदेच्या शिक्षण, महिला, बाल, युवक आणि क्रीडा समितीने नुकतेच एका अहवालातून या ढिलाईवर ताशेरे ओढले आहेत. ‘डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत देशातील दहा बहुप्रतिष्ठित उच्च शिक्षणसंस्था नियमित कुलगुरू वा संचालकाविना चालत असल्याचे पाहून आम्हाला अतिव दु:ख होत आहे,’ अशी टीका समितीने केली. यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याकडे विचारणा केली असता त्यांनी ‘निवडप्रक्रिया सुरू आहे’ असे उत्तर दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In india in charges appointed for 17 central educational institutions including iits iims css