भुवनेश्वर :  ओडिशात शुक्रवारी टाकलेल्या छाप्यानंतर जनतेकडून लुबाडलेला पैसा परत करण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर दिला होता. त्यानंतर शनिवारी प्राप्तिकर विभागाने ओडिशातील मद्य उत्पादक कंपन्यांच्या समूहावरील कारवाई तीव्र केली आहे. आयकर अधिकाऱ्यांनी शुक्रवापर्यंत सुमारे रोख २२५ कोटी रुपये जप्त केल्यानंतर शनिवारी बोलांगीर जिल्ह्यातील सुदापारा भागात एका देशी दारू उत्पादकाच्या घरातून रोख रकमेने भरलेल्या २० पिशव्या जप्त केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘जप्त केलेली एकूण रक्कम २९० कोटी?’

एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुदापारातून जप्त केलेल्या रकमेची मोजणी केली जात असून, ही रक्कम ५० कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शुक्रवारी मोजणीसाठी स्टेट बँकेच्या (एसबीआय) बोलंगीर येथील मुख्य शाखेत रोख रक्कम असलेल्या १५६ पिशव्या रक्कम मोजण्यासाठी घेऊन गेले होते. या कारवाईसाठी प्राप्तिकर विभागाचे महासंचालक संजय बहादूर गेल्या तीन दिवसांपासून भुवनेश्वरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांनी या छाप्याविषयी आणि अन्य तपशील सांगण्यास नकार दिला. त्यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले, की आमचे सहकारी या संदर्भात काम करत आहेत. 

सुमारे १५० अधिकारी मद्य उत्पादक कंपन्यांच्या समूहावर छापे टाकत असल्याचे समजते. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार छाप्यांदरम्यान विविध ठिकाणांहून जप्त केलेल्या ‘डिजिटल दस्तावेजां’च्या पडताळणीसाठी प्राप्तिकर विभागाने हैदराबादमधील आणखी २० अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा >>> धीरज साहूंच्या घरात नोटांचा पर्वत, खासदाराच्या ‘दौलती’बाबत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, अडचणी वाढल्या

सूत्रांनी सांगितले की, पश्चिम ओडिशातील सर्वात मोठय़ा देशी दारू उत्पादकांपैकी एक असलेल्या ‘बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीज’शी संबंधितांच्या उत्पादन स्थळ आणि संबंधितांच्या परिसरांवर छापे टाकल्यानंतर, प्राप्तिकर विभागाने आता समूहाशी संबंधित सर्व व्यक्तींची कार्यालये आणि निवासस्थानांना लक्ष्य केले आहे. ‘बलदेव साहू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड’ची उपकंपनी असलेल्या ‘बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड’ (बीडीपीएल) पासून छाप्याच्या कारवाईस सुरुवात झाली. त्यांनी सांगितले की ‘बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड’शी झारखंडमधील काँग्रेस नेते आणि खासदाराशी संबंध असल्याचा आरोप आहे.

संबलपूर, राउरकेला, बोलांगीर, सुंदरगड आणि भुवनेश्वर येथे छापे टाकण्यात आले. या छाप्याची बातमी ‘एक्स’वर प्रसृत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमूद केले, की  देशवासीयांनी नोटांचे हे ढिगारे पाहवेत आणि मग त्यांच्या नेत्यांची प्रामाणिकपणावरील ‘भाषणे’ ऐकावीत. जनतेकडून लुबाडलेला एक-एक पैसा परत करावा लागेल, ही मोदींची हमी (गॅरंटी) आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax department intensifies raids on distillery linked to congress mp zws