जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशातील करोनाबाधितांचा आकडा आता 5 हजार 734 वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात करोनाने 17 चा बळी घेतला आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 166 झाली आहे.

करोना तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या 5 हजार 734 जणांमध्ये अद्याप उपचार सुरू असलेले 5 हजार 095 जण, उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले 473 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची 166 ही संख्या समाविष्ट आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या तीन आठवडय़ांच्या टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याचे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दिले. शनिवारी, ११ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांनी पुन्हा बैठक बोलावली असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

टाळेबंदीचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र विविध राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि तज्ज्ञांकडून टाळेबंदी कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे. करोनामुळे देशात ‘सामाजिक आणीबाणी’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशाला कठीण निर्णय घ्यावे लागत आहेत. आपण सगळ्यांनी दक्ष राहिले पाहिजे, असे मोदी यांनी राजकीय नेत्यांना सांगितले आहे.