वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अमेरिकेबरोबर व्यापार करार करण्यास भारत उत्सुक आहे, मात्र भारत ज्या बाबींना नकार देत आहे त्याचा मान अमेरिकेने राखणे आवश्यक आहे, असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी रविवारी स्पष्ट केले. त्याचवेळी या द्विपक्षीय व्यापार करारावर सहमती घडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही परराष्ट्रमंत्र्यांनी दिली.

अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादल्यानंतर व्यापार करारावरील चर्चेला काहीसा धक्का बसला होता. आता ती पुन्हा सुरू झाली असून, गेल्या महिन्यात दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळांनी एकमेकांच्या देशाचा दौरा कला. कृषी उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रांबाबत अमेरिका काही अटी घालण्यासाठी आग्रही आहे. मात्र, त्याचे देशांतर्गत शेतीवर होणारा परिणाम विचारात घेऊन केंद्र सरकारतर्फे त्याला नकार दिला जात आहे.

नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना, जयशंकर यांनी दोन्ही देशांदरम्यान काही मतभेद असल्याचे मान्य केले. व्यापार करारावर दोन्ही देशांमध्ये संपूर्ण सहमती झाली नाही, त्याला आयातशुल्क कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अमेरिका ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे त्या देशाबरोबर सहमती होणे गरजेचे असल्याचेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.

व्यापार कराराच्या वाटाघाटींमध्ये भारत आणि अमेरिकेदरम्यान काही मतभेद आहेत. काही मुद्द्यांवर वाटाघाटी करणे शक्य असते. काही मुद्द्यांवर वाटाघाटी करता येत नाहीत. – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री