केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, आपत्कालीन सेवावगळता राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सगळ्यांच्याच दिव्यांवर बंदी
देशातील अतिविशिष्ट महत्त्वाच्या व्यक्तींच्या स्तोमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सरकारी गाडय़ांवर दिमाखात मिरविणाऱ्या लाल दिव्यांवर कायमची फुली मारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. केवळ लालच नव्हे, तर निळे, पांढरे, पिवळसर दिव्यांवरही बंदी घातली आहे. या निर्णयाने राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापासून ते जिल्हा पातळीवरील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाच्या गाडय़ांवर १ मेपासून कोणतेही दिवे नसतील. फक्त आपत्कालीन आणि मदतकार्यामध्ये सहभागी असलेल्या गाडय़ांनाच निळा दिवा वापरण्याची परवानगी असेल.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१३मध्ये दिलेल्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर लाल, निळे, पिवळे, पांढरे आदी सर्व रंगांच्या दिव्यांवर बंदी घालण्याचे घाटत होते. पण राजकीय सत्तेचे आणि व्हीव्हीआयपी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या लाल दिव्याला हात लावणे सहजासहजी शक्य नव्हते.
मात्र, मागील आठवडय़ात पंतप्रधान कार्यालयाने बोलाविलेल्या बैठकीमध्ये गडकरींच्या मंत्रालयाने दोन प्रस्ताव ठेवले होते. एकतर संपूर्ण बंदी किंवा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती आणि सरन्यायाधीशांचा अपवाद करून इतरांसाठी बंदी करावयाची, असे ते दोन पर्याय होते. मंत्रिमंडळाने पहिला पर्याय स्वीकारल्याने प्रतिष्ठेचे प्रतीक वापरण्याचा अधिकार आता कोणालाही राहिलेला नाही. या संदर्भात मोटार वाहन कायद्याच्या कलम १०८मध्ये दुरुस्ती करण्यात येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंदीच्या नियमातून व्हीव्हीआयपींना सवलत देण्याचा अधिकार राज्य सरकारांकडून काढून घेतला आहे. त्यामुळे राज्यांच्या पातळीवरसुद्धा कोणालाही कोणत्याही प्रकारचे दिवे वापरता येणार नाहीत. या संदर्भातील अधिसूचना एक, दोन दिवसांत निघण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नियमावलीचा सविस्तर तपशील अपेक्षित आहे.
फडणवीस, गडकरींनी लाल दिवे काढले..
लाल दिवा वापरण्यावर १ मेपासून बंदी असली तरी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्या झाल्या गडकरींनी तातडीने आपल्या गाडीवरील लाल दिवा काढला. तसे करणारे ते पहिले मंत्री झाले. नंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तशीच घोषणा केली आणि पुण्यामध्ये असताना गाडीवरून लाल दिवा हटविला. त्यानंतर अनेक मंत्र्यांनीही गडकरींचे अनुकरण केले.
- राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना चकाकता लाल दिवा (रेड बिकन विथ फ्लॅशर) वापरता येतो. राज्यांच्या पातळीवर राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश आदींसारख्या अतिवरिष्ठ व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना तोच दिवा असतो. त्यानंतरच्या महत्त्वाच्या व्यक्तींना नुसता लाल दिवा असतो.
- निळा किंवा पिवळसर (अंबर कलर) दिवा प्रामुख्याने वरिष्ठ अधिकारी वापरतात. मुख्य सचिवांपासून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत, पोलीस महासंचालकांपासून ते पोलीस उपअधीक्षकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या गाडय़ांवर निळा किंवा पिवळा दिवा असतो.
- मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, आता फक्त आपत्कालीन सेवेमधील आणि मदतकार्यामध्ये सहभागी असणाऱ्या वाहनांनाच निळा दिवा वापरता येईल. त्यामध्ये रुग्णवाहिका, अग्निशामक दलांपासून ते राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांना हा अधिकार असेल. शिवाय कर्तव्यावर असताना आणि आवश्यकता भासल्यास पोलीस अधिकारीही दिवा वापरू शकतील.
हा ऐतिहासिक निर्णय आहे. लाल दिवे व्हीव्हीआयपी संस्कृतीचे प्रतीक बनले होते. काही ठिकाणी, काही वेळेला त्याचा गैरवापरदेखील होतो. सामान्यांना ते रुचत नव्हते. लोकशाही मजबूत करणारा हा निर्णय आहे.. –नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री