हरिकिशन शर्मा, संडे एक्स्प्रेस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१ जूनपासून अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याचे फलित म्हणून भारताला मिळणाऱ्या महत्त्वाच्या लाभांमध्ये ११ प्रमुख उत्पादन तंत्रज्ञानांचा समावेश असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी सूत्रांनी ‘संडे एक्स्प्रेस’ला दिली. लढाऊ जेट इंजिन कराराचा भाग म्हणून भारताला हे ११ प्रकारचे तंत्रज्ञान मिळणार आहे.

आपल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदी प्रथमच २१ ते २४ जून दरम्यान अमेरिकेच्या अधिकृत राजकीय दौऱ्यावर असतील. मोदींच्या सन्मानार्थ अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने राजकीय मेजवानीचे आयोजन केले आहे. तसेच अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात पंतप्रधान मोदी यांचे भाषणही होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याच्या करारावर दोन्ही देश स्वाक्षऱ्या करतील, असा आडाखा बांधला जात आहे. हा करार भारत-अमेरिका संरक्षण सहकार्याला अनुसरून असेल. दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्याच्या अनुषंगाने नव्या रचनेवर आधारित या कराराचे २०१५मध्ये १० वर्षांसाठी नुतनीकरण करण्यात आले होते. सन २०१६मध्ये, द्विपक्षीय संरक्षणविषयक संबंधांना ‘प्रमुख संरक्षण भागीदारी’चा दर्जा देण्यात आला. अमेरिकेने भारताला दिलेला हा महत्त्वाचा दर्जा असल्याचे मानले जाते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकी कंपनी ‘जनरल इलेक्ट्रिक’च्या ‘जीइ-एफ४१४ आयएनएस ६ इंजिन’चे तंत्रज्ञान भारताच्या स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस एमके २’ला देण्याबाबतचा हा तत्वत: करार असेल. ‘तेजस एमके २’ ही ‘एमके१ए’ या हलक्या लढाऊ विमानाची (एलसीए) प्रगत आवृत्ती असून ‘हिंदूुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने (एचएएल) त्याची निर्मिती केली आहे.

इतिहासात प्रथमच..

’अमेरिकेने महत्त्वाचे तंत्रज्ञान अन्य देशाला हस्तांतरित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच अन्य कोणत्याही देशाने उच्च श्रेणीचे तंत्रज्ञान इतरांना दिलेले नाही.

‘जीइ-एचएएल’ लढाऊ जेट इंजिन कराराचा भाग म्हणून भारताला कमीतकमी ११ प्रकारचे तंत्रज्ञान मिळेल. दोन ते तीन वर्षांत त्यांचे हस्तांतरण भारताकडे होईल.

’करारानंतर एचएएल’बरोबर काम करण्यास अमेरिकी कंपनी सुरुवात करील, पण जेट इंजिनाच्या उत्पादनाचा कारखाना सुरू करण्यास किमान दोन वर्षे लागतील.