India-Pakistan Military Conflict: पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत असा दावा केला की, मे महिन्यात भारतासोबत झालेल्या लष्करी संघर्षात पाकिस्तानी हवाई दलाने भारताची ७ भारतीय विमाने पाडली. पाकिस्तानने यापूर्वीही अनेकदा दावा केला आहे की, त्यांनी भारतीय हवाई दलाची विमाने पाडली आहेत, परंतु भारताने हे दावे प्रत्येक वेळी फेटाळून लावले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने आजपर्यंत या दाव्यांबाबत कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.

“या वर्षी मे महिन्यात, माझ्या देशाला पूर्वेकडील आघाडीवरून विनाकारण आक्रमणाचा सामना करावा लागला. याला आमचा प्रतिसाद स्वसंरक्षणाच्या अनुषंगाने होता. आम्ही त्यांना अपमानास्पदरीत्या माघारी पाठवले”, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ संयुक्त राष्ट्रांच्या ८० व्या महासभेत बोलताना म्हणाले.

एप्रिलमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. या ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले होते.

पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर भारताने शस्त्रविरामास सहमती दर्शवली होती.

तत्पूर्वी, शरीफ यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासह आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी प्रादेशिक सुरक्षा, दहशतवादविरोधी सहकार्य आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली. ट्रम्प आणि शरीफ यांच्यातील ही पहिली औपचारिक द्विपक्षीय बैठक होती.

पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, ही बैठक वॉशिंग्टन डीसीमधील ओव्हल ऑफिसमध्ये झाली, जिथे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो देखील उपस्थित होते.

कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी पुन्हा दावा केला की, त्यांनी जगातील सात युद्धे रोखली आहेत. ट्रम्प यांनी अनेक वेळा असाही दावा केला आहे की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडचा संघर्ष संपवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलतानाही त्यांनी पुन्हा एकदा हा दावा केला होता. मात्र, भारताने ट्रम्प यांचा हा दावा अनेक वेळा फेटाळून लावला आहे.