India vs Pakistan Firing at LaC : पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. भारताने यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबवली होती. मात्र, त्यानंतर दोन्ही देशांनी सामंजस्याने युद्धविरामाचा निर्णय घेतला. मात्र, प्रत्यक्ष युद्ध थांबलं असलं तरी पाकिस्तानी लष्कराच्या सीमेवरील कुरापती थांबलेल्या नाहीत.

एका बाजूला पाकिस्तानी सरकार जगभरात भारताच्या नावाने गळा काढतंय, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी लष्कर मात्र काड्या करतंय. पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून गोळीबार चालू आहे. पाकिस्तानी लष्कराने शनिवारी मध्यरात्री सीमेवरून गोळीबार केला. यामुळे पुन्हा एकदा सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तणाव

पाकिस्तानी सैनिकांनी एलओसीजवळ छोट्या बंदुकांच्या सहाय्याने गोळीबार केला. त्यास भारतीय सैनिकांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैनिकांनी कुपवाडामधील नौगाम भागात एलओसीजवळून चार राऊंड फायर केले. त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने २० राऊंड फायर केले. त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार थांबवला. या चकमकीत कोणीही जखमी झालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही चकमक शस्त्रसंधीचं उल्लंघन मानलेली नाही.

या चकमकीबद्दल भारतीय लष्कराने कोणतंही अधिकृत निवेदन दिलेलं नाही. मात्र, ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी देखील अनेकदा अशा चकमकी घडल्या आहेत. बऱ्याचदा दहशतवाद्यांना सीमेवरून भारतात घुसता यावं यासाठी पाकिस्तानी लष्कर अशा प्रकारे गोळीबार करत असतं. अनेक वेळा भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्य व दहशतवाद्यांचे असे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

अन् भारतीय लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पुंछ जिल्ह्यात अशीच चकमक झाली होती. तेव्हा काही घुसखोर भारतात शिरण्याचा प्रयत्न करत होते. बालाकोट सेक्टरमधील सीमारेषेजवळ पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला होता. मात्र, भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला जशास तसं प्रत्युत्तर दिलं. तसेच घुसखोरीचा प्रयत्न देखील हाणून पाडला होता.