India Receives First Batch of Apache Helicopters: ऑपरेशन सिंदूरनंतर, भारत सातत्याने पश्चिम सीमेवर आपली लष्करी ताकद आणि लढाऊ क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत असताना, अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरच्या पहिल्या तुकडीची दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. १५ महिन्यांहून अधिक विलंबानंतर, पश्चिम सीमेवर तैनात करण्यात येणाऱ्या अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरची डिलिव्हरी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. आर्मी एव्हिएशन कॉर्प्सने मार्च २०२४ मध्ये जोधपूरमध्ये पहिले अपाचे स्क्वाड्रन उभारले होते, परंतु उभारणीच्या जवळजवळ १५ महिन्यांनंतरही, स्क्वाड्रन अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरशिवाय आहे.
अमेरिकेकडून अपाचे एएच-६४ई लढाऊ हेलिकॉप्टरची डिलिव्हरी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. २०२० मध्ये अमेरिकेसोबत झालेल्या ६०० दशलक्ष डॉलर्सच्या कराराचा भाग म्हणून, भारतीय लष्कराला मे-जून २०२४ पर्यंत सहा अपाचे हेलिकॉप्टरची डिलिव्हरी अपेक्षित होती. पण, पुरवठा साखळीत व्यत्यय आल्यामुळे ही डिलिव्हरी डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
याबाबतची माहिती असलेल्या सूत्रांनी असे सांगितले की, या हेलिकॉप्टरची पहिली तुकडी या महिन्यापर्यंत भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्सला सुपूर्त केली जाऊ शकते. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
सुरुवातीला, सहा हेलिकॉप्टरची तीन तुकड्यांमध्ये भारताला डिलिव्हरी करण्याची योजना होती. पहिली तुकडी २०२४ मध्ये मे ते जून दरम्यान अपेक्षित होती. पण, अपाचे हेलिकॉप्टरची पहिली तुकडी अद्याप भारतात पोहोचलेली नाही.
२०२० मध्ये अमेरिकेसोबत झालेल्या ६०० दशलक्ष डॉलर्सच्या कराराचा भाग म्हणून, भारतीय लष्कराला सहा अपाचे हेलिकॉप्टर मिळणार आहेत. पण, पहिल्या तुकडीच्या डिलिव्हरीला आता एक वर्षापेक्षा जास्त विलंब झाला आहे.
संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेला येणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे हा विलंब होत आहे. तीन हेलिकॉप्टरची पहिली तुकडी येत्या आठवड्यात भारतात पोहोचण्याची शक्यता आहे, तर उर्वरित तीन हेलिकॉप्टरची दुसरी तुकडी या वर्षाच्या अखेरीस भारतात पोहोचेल.
अपाचे एएच-६४ई लढाऊ हेलिकॉप्टर्स पश्चिम आघाडीवर लष्कराच्या महत्त्वाच्या ऑपरेशन्सना मदत व्हावी यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. हे प्रगत हेलिकॉप्टर्स त्यांच्या चपळता, अग्निशक्ती आणि प्रगत टार्गेट प्रणालीसाठी ओळखले जातात. लष्कराला शस्त्रागाराचा एक प्रमुख घटक म्हणून या अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्सची आवश्यकता आहे.
२०१५ मधील करारानुसार, भारतीय हवाई दलात २२ अपाचे हेलिकॉप्टरचा आधीच समावेश करण्यात आला आहे. भारतीय लष्कराचे एव्हिएशन कॉर्प्स हे लष्कराच्या ऑपरेशनल क्षमतांचा एक महत्त्वाचा घटक आहे, जे विविध मोहिमांसाठी आवश्यक हवाई सहाय्य प्रदान करते.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम सीमेवर तैनातीला बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे, परंतु अद्याप अमेरिकन लढाऊ अपाचे हेलिकॉप्टर भारताला मिळालेले नाहीत.
दरम्यान, भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्सच्या ताफ्यात अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर, ध्रुव, रुद्र, चित्ता, चेतक, फिक्स्ड-विंग हेलिकॉप्टर, हेरॉन, सर्चर आणि एमआय-१७ यांचा समावेश आहे.