Ballistic missile India भारत आपली लष्करी ताकद वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताकडून शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आहे, त्यामुळे या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी भारतासाठी महत्त्वाची मानली जात आहे. भारताने गुरुवारी ओडिशामधील चांदीपूर येथील क्षेपणास्त्र चाचणी केंद्रावरून पृथ्वी-२ आणि अग्नि-१ या दोन कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या लागोपाठ चाचण्या घेतल्या. संरक्षण मंत्रालयाने दोन्ही प्रणालींच्या यशस्वी प्रक्षेपणाची माहिती दिली. तसेच लडाखमध्ये आकाश प्राइम या हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी घेण्यात आली.
या चाचण्या किती महत्त्वाच्या?
संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केले की, दोन्ही चाचण्या भारताच्या अण्वस्त्र शस्त्रागारांचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार असलेल्या लष्करी शाखेच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत करण्यात आल्या. “दोन्ही क्षेपणास्त्रांचे चाचणी प्रक्षेपण पूर्णपणे यशस्वी झाले. हे प्रक्षेपण स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नियंत्रणाखाली करण्यात आले,” असे मंत्रालयाने म्हटले. पीटीआयच्या वृत्तानुसार, पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे ३५० किलोमीटर आहे आणि हे क्षेपणास्त्र ५०० किलोग्रॅमपर्यंतचे पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे.
अग्नि-१ क्षेपणास्त्राची मार्क क्षमता ७०० ते ९०० किलोमीटर आहे आणि ते १००० किलोग्रॅमचा पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्राचा वेळ ताशी सुमारे ९००० किलोमीटर आहे. पृथ्वी-२ आणि अग्नि-१ ही दोन्ही क्षेपणास्त्रे भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावतील. मुख्य म्हणजे बुधवारी, भारताने लडाखमध्ये भारताने स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या आकाश प्राइम या हवाई संरक्षण प्रणालीचीदेखील चाचणी करण्यात आली.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान, पाकिस्तानी लष्कराच्या चिनी लढाऊ विमाने आणि तुर्की ड्रोनने केलेले हवाई हल्ले हाणून पाडण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे या संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी महत्त्वाची मानली जात आहे. आकाश प्राइम ही भारतीय सैन्यासाठी आकाश शस्त्र प्रणालीची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे.
लडाखमधील ही चाचणी महत्त्वपूर्ण आहे कारण लडाख प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) जवळ आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, “भारताने १६ जुलै रोजी लडाखमध्ये दोन हवाई हाय-स्पीड मानवरहित लक्ष्ये यशस्वीरित्या नष्ट केली आणि चाचणी यशस्वी झाली. आकाश प्राइम भारतीय सैन्यासाठी आकाश शस्त्र प्रणालीची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे.”
अपग्रेड केलेल्या प्रणालीमध्ये स्वदेशी विकसित रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकरचादेखील समावेश आहे. त्याला भारतीय सैन्याच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केली गेली आहे. अशाप्रकारे, भारताने गेल्या दोन दिवसांत एकूण तीन यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीबद्दल भारतीय लष्कर, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ)चे अभिनंदन केले आहे.