Forget India, Come To Us, Pakistan Urges Donald Trump: रशियन कच्च्या तेलाची खरेदी आणि अमेरिकन कृषी उत्पादनांना बाजारपेठ खुली न करण्याच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेत सध्या व्यापार तणाव निर्माण झाला आहे. याचबरोबर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांची भारताबाबतची भूमिका नरमली आहे. अशात पाकिस्तानचे माजी सुरक्षा सल्लागार डॉ. मोईद युसूफ यांनी अमेरिकेने भारताला विसरून, आता पाकिस्तानशी संबंध प्रस्थापित करावेत, असे आवाहन केले आहे.

फॉरेन अफेयर्स मासिकातील एका लेखात डॉ. युसूफ यांनी असा युक्तिवाद केला आहे की, अमेरिकेची भारतातील दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणूक अयशस्वी ठरली आहे.

युसूफ यांनी अमेरिकेला त्यांच्या दक्षिण आशिया धोरणाचा पुनर्विचार करण्याचे आणि पाकिस्तानसोबत अधिक संतुलित भागीदारी करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेची पाकिस्तानबरोबरची भागीदारी प्रादेशिक स्थिरतेला प्रोत्साहन देईल आणि यामुळे अमेरिका व चीनमधील तणाव कमी होण्यासदेखील मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

या लेखात युसूफ असेही म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाविरुद्धच्या प्रभावी कारवाईसाठी आणि भारताबरोबरचा तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी पाकिस्तानचे कौतुक केले होते.

भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या लष्करी कारवाईबाबत युसूफ यांनी लिहिले आहे की, “अमेरिकेचे पाकिस्तानला कमकुवत आणि एकाकी ठेवण्याचे निर्णय भारताच्या ध्येयाशी अगदी सुसंगत होते. यामुळे भारताला अधिक आक्रमक भूमिका घेण्यास, पाकिस्तानी हद्दीत लष्करी हल्ले करण्यास प्रोत्साहन मिळाले. भारताच्या वाढत्या आक्रमक कृतींमुळे पाकिस्तानला चीनच्या बाजूने जाण्यास भाग पाडले.”

मे मध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान व पाकिस्तान व्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी ठिकाणांवर लष्करी कारवाई केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी संघर्ष झाला होता. दरम्यान, भारत-पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष आपण थांबवला असा दावा डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. मात्र, भारताने ट्रम्प यांचा हा दावा नाकारला आहे.

यानंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. याचाच भाग म्हणून पाकिस्तानचे लष्करप्रमुख असमी मुनीर यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये दोन वेळा अमेरिका दौरा केला आहे. याचबरोबर अमेरिकेने पाकिस्तानमध्ये गुंतवणुकही वाढवली आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी भारताबाबतची भूमिका मवाळ करत, सकारात्मक विधाने करायला सुरूवात केली आहे.