Vladimir Putin backs India: रशियाकडून कच्च तेल आयात केल्यामुळे अमेरिकेने भारतावर भरमसाठ आयातशुल्क (टॅरिफ) लादले आहे. तसेच एच१-बी व्हिसाची शुल्कवाढ करून भारतातील आयटी कर्मचार्‍यांसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. अमेरिकेकडून भारतावर व्यापार दबाव वाढत असताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मोठे विधान केले आहे. “भारताने कुणाच्याही दबावाला बळी न पडता स्वतः ला अपमानित करून घेऊ नये. भारतावर दबाव टाकून इंधन आयात बंद करण्याचे प्रयत्न अमेरिकेच्या अंगलट येऊ शकतात”, असे पुतिन म्हणाले आहेत.

दक्षिण रशियाच्या सोची येथील ब्लॅक सी रिसॉर्टमध्ये १४० हून अधिक देशांच्या सुरक्षा आणि भू-राजकीय विश्लेषकांच्या आंतरराष्ट्रीय वाल्दाई चर्चेत पुतिन बोलत होते. रशियाच्या व्यापारी मित्रांवर जर अमेरिकेने आयातशुल्क लादले तर आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती भडकतील आणि अमेरिकला व्याज दर उच्च ठेवावा लागेल. यामुळे अमेरिकची अअर्थव्यवस्था मंदावेल, असा इशारा पुतिन यांनी दिला.

पुतिन यांनी डिसेंबर महिन्यात भारताचा दौरा करणार असल्याचेही सुतोवाच यावेळी केले. भारताबरोबर आमचे चांगले संबंध असून यामध्ये कोणतीही अडचण किंवा तणाव नाही, असेही पुतिन यावेळी म्हणाले.

भारताने जागतिक दबावाला बळी पडण्याची गरज नाही. स्वतःचा अपमान करून घेण्याचीही भारताला गरज नाही. बाह्य दबावाला बळी पडून पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असेही पुतिन यावेळी म्हणाले.

भारताने रशियाकडून आयात थांबवली तर…

पुतिन पुढे म्हणाले की, भारताने जर रशियाकडून होणारी इंधन आयात थांबवली तर भारताला ९ ते १० अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागेल. भारतातील राजकीय नेते काय निर्णय घेतात, याकडे त्यांच्या देशीतील लोकांचे बारीक लक्ष असते आणि कुणासमोरही आपला अपमान व्हावा, असे तेथील जनतेला बिलकुल आवडत नाही. पंतप्रधान मोदींना मी स्वतः ओळखतो. ते कोणतीही चुकीची पावले उचलणार नाहीत, असे ते म्हणाले.

व्यापार असमानता कमी करण्याचा प्रयत्न

अमेरिकेने टॅरिफ लादून दंडात्मक कारवाई केल्यामुळे भारताचे जे नुकसान होत आहे, ते रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीद्वारे संतुलित केले जाईल. तसेच यामुळे भारताच्या सार्वभौम राष्ट्राची प्रतिष्ठाही राखली जाईल, असेही व्लादिमिर पुतिन यांनी यावेळी म्हटले. व्यापार असमतोल दूर करण्यासाठी रशिया भारताकडून अधिक प्रमाणात कृषी उत्पादने आणि औषधे खरेदी करू शकतो, असेही सुतोवाच पुतिन यांनी केले.