Indian Air Force Tejas Jets Deal with HAL : भारतीय वायूदलाने ९७ तेजस मार्क-१ए ही लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हिंदुस्तान एअरोनॉटिकल्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीशी मोठा करार केला जाणार आहे. हा आजवरचा सर्वात मोठा व्यवहार असल्याचं म्हटलं जात आहे. तब्बल ६६,५०० कोटी रुपयांमध्ये भारतीय वायूदल व एचएएलमध्ये हा करार होऊ शकतो.

भारतीय वायूदलाचा हा विमान खरेदीचा आजवरचा सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे. येत्या गुरुवारी हा करार केला जाईल. कारण शुक्रवारी ३६ जुनी मिग-२१ विमानं वायूदलाच्या सेवेतून निवृत्त होतील. त्यामुळे वायूदलाच्या ताफ्यातील लढाऊ विमांची संख्या कमी होईल. ही पोकळी भरून काढण्यासाठी भारतीय वायूदलाला नव्या लढाऊ विमानांची गरज भासणार आहे. टाइम्स ऑप इंडियाने या होऊ घातलेल्या कराराबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

वायूदलाचं बळ वाढवण्याची आवश्यकता

भारतीय वायूदल लढाऊ विमानांच्या बाबतीत सध्या कमकुवत स्थितीत आहे. कारण भारताकडे सध्या केवळ २९ फायटर स्क्वाड्रन्स (लढाऊ विमानांच्या तुकड्या, एका तुकडीत १७ ते १८ लढाऊ विमानं असतात) आहेत. भारतीय वायूदलाच्या एका अंतर्गत अहवालात म्हटलं आहे की चीन किंवा पाकिस्तानचा कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झाला तर अशा स्थितीत ४२ स्क्वाड्रन देखील पुरेसे नाहीत. त्यामुळे अधिकाधिक लढाऊ विमानं मिळावी ही मागणी वायूदलाने सातत्याने लावून धरली आहे. ही मागणीकाही अंशी पूर्ण होऊ शकते. कारण आता वायूदल ९७ नवी तेजस विमानं खरेदी करत आहे.

एअर मार्शल ए. पी. सिंह यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात म्हटलं होतं की भारतीय वायूदल लढाऊ विमानांच्या बाबतीत कमकुवत स्थितीत आहे. भारतीय वायूदलाला दर वर्षी ४० नव्या लढाऊ विमानांची आवश्यकता आहे.

आधीच्या कराराचं काय झालं?

याआधी फेब्रुवारी २०२१ मध्ये ८३ तेजस मार्क-१ए विमानांच्या खरेदीचा व्यवहार झाला होता. एचएएलला फेब्रुवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२८ दरम्यान या विमानांची डिलीव्हरी करायची आहे. तेव्हा ४६,९८९ कोटी रुपयांमध्ये या ८३ तेजस विमानांच्या खरेदीचा करार झाला होता. मात्र, आतापर्यंत या करारापैकी एकही विमान वायूदलाला मिळालेलं नाही. एचएएलने दावा केला आहे की या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत दोन तेजस विमानं भारतीय वायूदलाकडे सुपूर्द केली जातील.