Indian Woman Anala Avlani Arrested: गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक भारतीय महिला काही अमेरिकन पोलीस अधिकाऱ्यांसमोर गयावया करताना दिसत आहे. या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. सदर भारतीय महिलेला एका दुकानात (Target Shop) चोरी करताना अटक करण्यात आल्याचं व्हिडीओतील संवादांवरून स्पष्ट होत आहे. या वस्तूंची किंमत तब्बल १ लाख १० हजारांच्या घरात आहे. सदर महिलेचं नाव अनाया अवलानी असल्याचं सांगितलं जात असून तब्बल ७ तास ही महिला या दुकानात होती!

नेमकं काय घडलं?

सदर महिला टुरिस्ट व्हिसावर अमेरिकेत गेल्याची माहिती समोर आली आहे. व्हायरल व्हिडीओंमधून समोर आलेल्या तपशीलानुसार, या भेटीदरम्यान ही महिला Target Shop या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये खरेदीसाठी गेली. तब्बल सात तास ही महिला या ठिकाणी होती. जवळपास १ हजाराहून जास्त अमेरिकन डॉलर्स किमतीच्या वस्तू तिनं आपल्या बकेटमध्ये जमा केल्या. पण जेव्हा बिलाची रक्कम चुकवायचा टप्पा आला, तेव्हा मात्र पैसे न भरताच ही महिला दुकानाच्या दरवाजातून बाहेर जाताना सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आली.

सदर महिला बाहेर जात असतानाच तिला एका व्यक्तीने हटकलं आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या व्यवस्थापनासमोर उभं केलं. तिथे काही वेळाने पोलीस दाखल झाले आणि त्यांनी सदर महिलेची उलट तपासणी सुरू केली. यावेळी आपल्याला सोडून देण्यासाठी ही महिला पोलिसांसमोर गयावया करू लागली.

“मी घेतलेल्या सर्व वस्तूंचे पैसे द्यायला तयार आहे. मी ते पैसे देऊन सुटू शकत नाही का?” अशी विचारणा या महिलेकडून पोलिसांना करण्यात येत आहे. पोलिसांकडून मात्र, “आता ती वेळ निघून गेली आहे, तुम्ही गुन्हा केला आहे”, असं उत्तर महिलेला देण्यात आलं आहे.

“मला कुठल्याही फंदात पडायचं नाहीये”

दरम्यान, आपल्याला कोणत्याही भानगडीत अडकायचं नसल्याचं सदर महिला वारंवार या पोलीस अधिकाऱ्यांना विनवत आहे. “जर मी घेतलेल्या वस्तूंचे सगळे पैसे दिले, तर त्याच काय बिघडणार आहे? मी खरंच या गोष्टीची माफी मागते. मी त्या सगळ्या वस्तूंचे पैसे द्यायला तयार आहे. माझा पासपोर्ट घेऊ नका, मला कुठल्याही फंदात पडायचं नाहीये. तुम्ही मला पोलीस स्टेशनला नेलं तर मी परत कशी जाणार? मी पैसे भरते आणि जाते”, अशा शब्दांत सदर महिला पोलिसांच्या विनवण्या करताना दिसत आहे.

“भारतात अशी चोरी करायची परवानगी असते का”

दरम्यान, आपण या देशात थांबणारही नाही आहोत, निघून जाणार आहोत असं सदर महिला पोलिसांना सांगत असतानाच तेथील महिला अधिकाऱ्याने भारताचा उल्लेख करून प्रश्न विचारला. “भारतात तुम्हाला अशा प्रकारे वस्तू चोरायची परवानगी असते का? मला खात्री आहे तसं काही नसेल”, असं ही पोलीस अधिकारी म्हणाताना व्हिडीओत ऐकू येत आहे. चौकशी करणाऱ्या अधकाऱ्यांपैकी महिला अधिकाऱ्याच्या कपड्यांवर लावलेल्या बॉडी कॅमेऱ्यात हा प्रकार रेकॉर्ड करण्यात आला आहे.

“मी दुकानाच्या गेटवर दुसऱ्या कुणाचीतरी वाट बघत होते. त्या एवढ्या सगळ्या बॅगा घेऊन मी कशी पळून जाणार होते? कोणत्याही व्यक्तीसाठी ते अशक्य आहे”, अशा शब्दांत सदर महिला तिची बाजू मांडत असल्याचंही व्हिडीओ दिसत आहे.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

दरम्यान, हे व्हिडीओ व्हायरल होत असताना सोशल मीडियावर या प्रकाराबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही युजर्सकडून सदर महिलेबाबत वाईट वाटत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पण काही युजर्स मात्र या प्रकारामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची प्रतिमा मलीन होत असल्याचं मत व्यक्त केलं आहे.