India and Russia Deal : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. याचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या व्यापार धोरणांवर आणि आंतरराष्ट्रीय धोरणांवर सातत्याने टीका करत आहेत. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जवळपास ५० टक्के आयात शुल्क लादलं आहे. त्यांमुळे भारताला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. यातच भारताने रशियाकडून तेल आयात करू नये म्हणून ट्रम्प सातत्याने टीका करत आहेत. मात्र, अमेरिकेच्या या दबावाला भारत जुमानत नाहीये. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारताने रशियाबरोबर विमान निर्मितीच्या क्षेत्रातील ऐतिहासिक करार केला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) यांनी ऐतिहासिक करार केला आहे. या करारानुसार आता सुखोई सुपरजेट SJ-१०० या नागरी विमानाच्या निर्मितीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
वृत्तानुसार, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्यातून भारत SJ-१०० नागरी प्रवासी विमानांचं उत्पादन करण्यासाठी आता सज्ज झाला आहे. या करारामागचं उद्दिष्ट प्रादेशिक हवाई संपर्क आणि देशांतर्गत उत्पादन वाढवणे हे असून त्यामुळे भारताच्या विमान वाहतूक उद्योगासाठी एक नवीन युग असेल. या प्रकल्पामुळे प्रादेशिक विमानांची मागणी देखील पूर्ण होईल आणि विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
रशियाच्या मॉस्कोमध्ये मंगळवारी या कराराची स्वाक्षरी झाली असून भारताने पहिल्यांदाच संपूर्ण प्रवासी विमानाचं उत्पादन करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकलं आहे. दरम्यान, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे प्रभात रंजन आणि ओलेग बोगोमोलोव्ह यांच्यासह आदींच्या उपस्थित या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे. केंद्राच्या यूडीएएन योजनेअंतर्गत प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्यात हा निर्णय महत्त्वाची भूमिका बजावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उद्योगाच्या अंदाजानुसार पुढील दशकात भारताला प्रादेशिक मागणी पूर्ण करण्यासाठी या श्रेणीतील २०० पेक्षा जास्त जेट्सची आवश्यकता असेल. तसेच हिंद महासागर क्षेत्रातील जवळच्या आंतरराष्ट्रीय स्थळांना सेवा देण्यासाठी आणखी ३५० विमानांची आवश्यकता असेल, त्यामुळे हा करार भारतासाठी एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे.
