एक्स्प्रेस वृत्त
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा स्थगित अवस्थेत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेले २५ टक्के आयातशुल्क ७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्याचवेळी अमेरिकेबरोबर झालेला व्यापार करार युरोपीय महासंघासाठी (ईयू) फारसा चांगला नसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या अटी मान्य करून अमेरिकेबरोबर व्यापार करार करण्याची घाई करणे धोक्याचे असल्याचे सरकारमधील एका गटाचे म्हणणे असल्याची माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे.
दोन्ही देशांदरम्यान १ ऑगस्टपूर्वी प्राथमिक व्यापार कराराचा मसुदा तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र ट्रम्प यांनी ३० जुलैला भारतावर २५ टक्के आयातशुल्क आणि रशियाकडून लष्करी सामग्री व कच्चे तेल खरेदी करत असल्याबद्दल दंड लादण्याची घोषणा केली. त्यामुळे अमेरिकेबरोबर व्यापार करार करण्यासाठी भारताकडून घाई केली जाईल का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, अमेरिका व ‘ईयू’दरम्यान झालेल्या व्यापार कराराच्या धर्तीवर अमेरिकेबरोबर करार करण्यास भारत उत्सुक नसल्याचे सांगण्यात आले.
ट्रम्प यांच्या मर्जीप्रमाणे करार करण्यात धोका आहे. यामुळे करारात भारताची बाजू कमकुवत होऊ शकते अशी भीती केंद्र सरकारमधील एका गटाला वाटत आहे. दुसरे म्हणजे ट्रम्प ज्या देशांना स्वत:चे मित्र म्हणतात त्यांच्या हिताचा ते फारसा विचार करत नाहीत. अमेरिकेबरोबर सौम्य भूमिका घेतल्याने ट्रम्प प्रशासन त्या देशाला दुर्बल समजते अशी भावना सरकारमध्ये वाढत आहे. त्याचवेळी चीन अमेरिकेने भूमिका घेण्याची प्रतीक्षा करावी असाही विचार आहे.
अमेरिका-‘ईयू’ व्यापार करारावर युरोपीय महासंघाच्या काही सदस्य देशांनीच टीका केली आहे. हा करार अमेरिकेसाठी फायदेशीर असून युरोपसाठी नुकसानकारक आहे असे फ्रान्सने म्हटले आहे.