दर तासांला एक हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण देशात आढळून येत आहेत. देशात गेल्या चार दिवसांत एक लाख नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाख्यांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

देशात दोन लाख ८३ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत पाच लाख १५ हजार ३८६ रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासांत ५१९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून देशात दिवसाला २० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मागील पाच दिवसांपासून देशात २५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या चार दिवसांत देशात एक लाखांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सातत्याने विविध राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ताज्या माहितीनुसार, रुग्ण वाढीची ही साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी गरजेप्रमाणे स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाउन करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, राज्यात पुणे आणि ठाण्यात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर केरळमधील थिरुवअनंतपुरम तसेच संपूर्ण उत्तर प्रदेशात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.