मध्य प्रदेशच्या इंदूर येथील कल्पना नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. माजी प्रेयसीवर संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी एक प्रियकर सातत्याने दबाव टाकत होता. मात्र प्रेयसीने यासाठी नकार दिल्यानंतर संतापलेल्या प्रियकराने भयंकर कृत्य केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरूणीनं काही काळापूर्वी आरोपीबरोबरचे संबंध तोडले होते. तरीही तरूणाकडून संबंध पुन्हा ठेवण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यानंतर त्याने तरूणीबरोबर धक्कादायक कृत्य केले.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आरोपी प्रियकराने सदर तरूणीवर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
हीरानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुशील पटेल यांनी सांगितले की, आरोपीचे नाव राजेंद्र चौरसिया आहे. त्याने बुधवारी तरूणीला रस्त्यात गाठून तिला पुन्हा लिव्ह-इनमध्ये राहण्यास बळजबरी केली. तरूणीने यासाठी नकार देताच दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर राजेंद्र तिथून निघाला. पण थोड्याच वेळात तो त्याच्या दुचाकीवरून तरूणीच्या दिशेने वेगाने आला. एका क्षणात त्याने तरूणीला दुचाकीची धडक दिली आणि तिथून पळ काढला.
आरोपी राजेंद्र आपल्या दिशेने वेगाने येत असल्याचे पाहून तरूणीने त्याच्यावर दगडही फेकला होता. तरीही राजेंद्र थांबला नाही. दुचाकीची धडक लागल्यानंतर तरूणी जवळच असलेल्या भिंतीवर आपटली आणि खाली पडली. यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी तरूणीला उचलले आणि रुग्णालयात दाखल केले.
सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून प्रियकराचे क्रूर कृत्य त्यात दिसून येत आहे.
म्हणून प्रेयसीनं प्रियकराला सोडलं…
पोलिसांच्या तपासात समजले की, राजेंद्र आणि पीडित तरूणी काही काळ लिव्ह-इनमध्ये राहत होते. मात्र राजेंद्रला नशा करण्याची सवय होती. त्यामुळे तो दिवसेंदिवस हिंसक होत चालला होता. त्याच्या विचित्र वागण्याला कंटाळून पीडित तरूणीने नाते संपवले आणि ती मुंबईला जाऊन नोकरी करू लागली.
याच महिन्यात पीडित तरूणीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे ती पून्हा इंदूरला आली होती. तरूणी पुन्हा इंदूरमध्ये आल्याचे कळताच आरोपी राजेंद्र तिच्या घराच्या आसपास घुटमळू लागला. बुधवारी राजेंद्रने पीडित तरूणीला गाठले आणि तिला पुन्हा एकत्र येण्यास बळजबरी केली. मात्र तरूणीनं नकार देताच त्याने तिच्यावर हल्ला केला.
आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तरूणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला.