IPS Puran Kumar has Conflicts with Senior Officials : हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी पोलीस महानिरीक्षक वाय. पूरन कुमार हे मंगळवारी (७ ऑक्टोबर) त्यांच्या चंदीगडमधल्या सेक्टर ११ मधील राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या डोक्याला गोळी लागली होती. तसेच त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर हातात होती. यावरून त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने देशभर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास केल्यानंतर पूरन कुमार यांचं मृत्यूपत्र व सुसाइड नोट देखील सापडली आहे. ज्यामध्ये त्यांनी कार्यालयातील समस्यांचा उल्लेख केला आहे. परंतु, अद्याप ही सुसाइड नोट त्यांचीच आहे याबाबतची खातरजमा झालेली नसल्यामुळे सदर सुसाइड नोट उघड केलेली नाही.
पूरन कुमार यांच्या आत्महत्येचं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नऊ दिवसांपूर्वी (२९ सप्टेंबर रोजी) त्यांची बदली झाली होती. त्यांना पोलीस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली होती. पीटीसी सुनारियाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. आत्महत्या केली तेव्हा ते रजेवर होते.
इंडिया टूडेच्या वृत्तानुसार पूरन कुमार यांचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होते. बेकायदेशीर पदोन्नती, जातीय भेदभाव, प्रशासनिक छळ यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी मुख्यमंत्री व अनेक वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना पत्रे लिहून नाराजी व्यक्त केली होती. गृह मंत्रालयाच्या नियमांचं उल्लंघन, अनुसूचित जातीच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बाबतीत होणारा भेदभाव, त्यांच्या नियुक्त्यांमधील पक्षपाती वागणूक याबाबत त्यांनी तक्रारी केल्या होत्या.
पूरन कुमार यांचे वरिष्ठांशी वाद
पूरन कुमार हे गेल्या दिड वर्षापासून चर्चेत होते. त्यांना एडीजीपी (अतिरिक्त पोलीस महासंचालक) रँकवरून आयजी (पोलीस महानिरीक्षक) म्हणून बढती दिली होती. पूरन कुमार यांनी गेल्या वर्षी वन ऑफिसर वन हाउस धोरणांतर्गत हरियाणातील अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची तक्रार केली होती. काही आयपीएस अधिकाऱ्यांनी एकापेक्षा अधिक शासकीय निवासस्थानं बळकावली आहेत असा कुमार यांचा दावा होता. यासह त्यांनी माजी पोलीस महासंचालक व राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जातीच्या आधारावर भेदभाव करत असल्याचा आरोपही केला होता. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं.
सुसाइड नोटमध्ये काय म्हटलंय?
चंदीगडच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) कंवरदीप कौर यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की पूरन कुमार यांचा मृतदेह ज्या खोलीत आढळला तिथेच एक सुसाइड नोट सापडली आहे. फॉरेन्सिक पथक या सुसाइड नोटची तपासणी करत आहे. ती सुसाइड नोट पूरन कुमार यांनीच लिहिली होती याची खात्री झाल्यानंतर आम्ही ती सार्वजनिक करू. सुसाइड नोटमध्ये काय लिहिलंय ते सांगण्यास तूर्तास पोलिसांनी नकार दिला.