Iran President Masoud Pezeshkian on Donald Trump : “तुम्ही आम्हाला धमक्या देत असाल तर आम्हाला तुमच्याबरोबर बातचीत करण्याची इच्छा नाही. त्यावर तुम्हाला जे करायचं असेल ते करा”, अशा शब्दांत इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ट्रम्प यांनी फोनवरून इराणला धमकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर पेजेशकियन यांनी दंड थोपटले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाची सूत्रे हाती आल्यानंतर अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यांच्या निर्णयांचे जगभर पडसाद उमटत आहेत. ट्रम्प अनेक छोट्या देशांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच प्रयत्न त्यांनी इराणबरोबर केल्यानंतर इराणने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसमोर यांच्याशी वाद घातल्याचं पाहायला मिळालं. युक्रेनपाठोपाठ त्यांनी इराणकडे डोळे वटारले आहेत. मात्र, इराणने देखील ट्रम्प यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. इराणच्या सरकारने त्यांच्या अणू कार्यक्रमाला लगाम लावावा, असं ट्रम्प यांचं म्हणणं होतं. त्यावर आता इराणने संताप व्यक्त केला आहे.

इराणचे अध्यक्ष नेमकं काय म्हणाले?

पेजेशकियन यांनी मंगळवारी एका भाषणात ट्रम्प यांना उद्देशून म्हटलं की, “अलीकडेच तुम्ही युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबरोबर जे काही केलंत, ज्या पद्धतीने वागलात त्याची तुम्हाला शरम वाटायला हवी.” ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊस (अमेरिकेच्या अध्यक्षांचं कार्यालय व निवासस्थान) येथे बोलावलं होतं. दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये युद्ध थांबवण्यासंदर्भात चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र, ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना मागे हटण्यास सांगितलं. त्यानंतर झेलेन्स्की व ट्रम्प यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यामुळे जगभरातून ट्रम्प यांच्यावर पाहुण्यांचा घरी बोलावून अपमान केल्याची टीका झाली.

आयातुल्लाह खोमेनी यांचाही ट्रम्प यांच्यावर पलटवार

इराणच्या अणू कार्यक्रमावरून उभय देशांमधील वातावरण तापलं आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या इराणविरोधी वक्तव्यांना पेजेशकियन यांनी उत्तर दिलं आहे. इराणचे अध्यक्ष ट्रम्प यांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही मला धमक्या देत असाल तर मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही. तुम्हाला जे करायचं असेल ते करा. मुळात अमेरिकेने आम्हाला आदेश देऊ नयेत.” दुसऱ्या बाजूला इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह सैय्यद अली खोमेनी यांनी ट्रम्प यांची भाषा अपमानजनक व निरर्थक असल्याचं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iran president masoud pezeshkian rejects donald trump nuclear deal proposal asc