Iran Cancels Visa Free Entry For Indians: इराणने सामान्य पासपोर्ट असलेल्या भारतीय नागरिकांसाठी व्हिसा सवलत रद्द करण्याची घोषणा केली आहे. २२ नोव्हेंबरपासून, भारतीय प्रवाशांना व्हिसाशिवाय इराणमध्ये प्रवेश करता येणार नाही. भारतीय नागरिकांना इराणमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि इराणमधून प्रवास करण्यासाठी आधीच व्हिसा घेणे बंधनकारक असणार आहे.
पूर्वीच्या धोरणामुळे भारतीय पर्यटकांना काही अटींसह व्हिसाशिवाय इराणमध्ये प्रवेश करण्याची परवानगी होती. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि आशियाई देशांशी संबंध मजबूत करण्यासाठी इराणने हा निर्णय घेतला होता. पण आता या बदलामुळे सामान्य पासपोर्ट असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला इराणला जाण्यापूर्वी वैध व्हिसा मिळवणे आवश्यक असेल.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशांकडे विमानात चढण्यापूर्वी त्यांचा इराणी व्हिसा असणे आवश्यक आहे. हा नियम इराणी विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांनाही लागू होणार आहे. त्यामुळे व्हिसाशिवाय कोणत्याही परदेशी व्यक्तीला इराणमधून प्रवास करता येणार नाही.
सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळांची संख्या अधिक असल्याने इराण भारतीय पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. पर्यटक अनेकदा इस्फहान आणि शिराझ सारख्या शहरांना त्यांची वास्तुकला पाहण्यासाठी भेट देतात, तर कोम आणि मशहद सारखी ठिकाणे तीर्थस्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. इराणच्या वाळवंटातील भूदृश्ये आणि जुन्या सिल्क रोडकडेही अनेक पर्यटक आकर्षित होतात.
तेहरानमधील भारतीय दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, व्हिसा फ्री धोरणामुळे अनेक भारतीय नागरिकांना नोकरी किंवा पुढील प्रवासाचे खोटे आश्वासन देऊन इराणमध्ये आणण्यात येते आणि नंतर खंडणीसाठी अपहरण करण्यात येते. अशा अनेक घटना समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
“रोजगाराच्या खोट्या आश्वासनांवर किंवा पुढे कोणत्यातरी देशात नेण्याचे आश्वासन देऊन भारतीय नागरिकांना इराणमध्ये आणण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सामान्य भारतीय पासपोर्ट धारकांसाठी उपलब्ध असलेल्या व्हिसा सवलतीच्या सुविधेचा फायदा घेऊन या व्यक्तींना इराणमध्ये आणण्यात आले. इराणमध्ये पोहोचताच, त्यापैकी अनेकांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले”, असे तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या निवेदनात म्हटले आहे.
व्हिसा फ्री धोरणाचा पुढील गैरवापर टाळण्यासाठी इराण सरकारने आता २२ नोव्हेंबर २०२५ पासून सामान्य भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा फ्री प्रवेश रद्द केला आहे. त्यामुळे २२ नोव्हेंबरपासून भारतीयांना इराणमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा इराणमधून प्रवास करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता असेल.
