Iran’s Supreme Leader Ayatollah Ali Khamenei: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्यास सांगितले होते. यावर आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. इराण लादलेली शरणागती किंवा शस्त्रसंधी स्वीकारणार नाही. तसेच अमेरिकेने आमच्यावर लष्करी कारवाई केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सांगितले आहे.
अयातुल्ला खामेनी यांनी बुधवारी राष्ट्रीय टीव्ही वाहिनीवर देशाला संबोधित करताना हे विधान केले. शुक्रवारी इस्रायलने इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केल्यानंतर खामेनींनी पहिल्यांदाच जाहीर संबोधन केले आहे. ते म्हणाले, “झायोनिस्ट राजवटीने मोठी चूक केली आहे. याचे परिणाम भोगण्याची त्यांनी आता तयारी ठेवावी. आमच्या हवाई क्षेत्रात झालेले उल्लंघन आम्ही माफ करणार नाही. तसेच आमच्या शहिदांनी वाहिलेले रक्तही वाया जाऊ देणार नाही.”
इराण झुकणार नाही
अयातुल्ला खामेनी पुढे म्हणाले, “इराणमधील लोकांना आणि इराणच्या इतिहासाला ओळखणारे लोक कधीही इराणशी अशा धमकीच्या भाषेत बोलू शकत नाहीत. कारण इराणी लोक शरणागती पत्करणाऱ्यांमधील नाहीत. ज्या लोकांनी आमच्यावर युद्ध लादले, त्यांच्याविरोधात आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहू. तसेच आमच्यावर शांती लादणाऱ्यांचाही आम्ही विरोध करतो. कोणत्याही प्रकाराच्या दबावापुढे इराण झुकणार नाही.”
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्याबाबत मंगळवारी मोठे विधान केले होते. “आम्हाला माहिती आहे की, खामेनी कुठे लपले आहेत”, असे सांगून ट्रम्प यांनी बिनशर्त शरणागती पत्करावी, असे आवाहन केले होते. खामेनी कुठे लपून बसले आहेत, हे आम्हाला माहीत असले तरी सध्या तरी आम्ही त्यांना मारणार नाहीत, असेही ट्रम्प म्हणाले होते.