हैफा : ‘‘ऑटोमन साम्राज्यापासून आम्हाला ब्रिटिशांनी नव्हे, तर भारतीय सैनिकांनी मुक्त केले. शालेय इतिहासाच्या पुस्तकात तसे बदल केले जात आहेत,’’ असे वक्तव्य इस्रायलमधील हैफा शहराचे महापौर योना याहॅव यांनी केले आहे. महापौरांनी भारतीय जवानांच्या शौर्याची आठवण म्हणून स्मृतिस्थळाला आदरांजली अर्पण केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याहॅव म्हणाले, ‘‘माझा या शहरात जन्म झाला आणि मी इथूनच पदवीधर झालो. आम्हाला सातत्याने सांगितले गेले, की हे शहर ब्रिटिशांनी मुक्त केले. एकदा ‘हिस्टॉरिकल सोसायटी’मधील संशोधकांनी सांगितले, की त्यांनी याबाबत पूर्ण संशोधन केले आहे. त्यांना आढळून आले, की या शहराला ब्रिटिशांनी नव्हे, तर भारतीयांनी (ऑटोमन सत्ताधाऱ्यांपासून) मुक्त केले. प्रत्येक शाळेत आता तसा बदल करण्यात येत आहे. आम्हाला ब्रिटिशांनी नव्हे, तर भारतीयांनी मुक्त केले.’’
हैफा येथील तिसरी ते पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकात या धड्याचा समावेश आहे. गेली १० वर्षे ‘हैफा हिस्टॉरिकल सोसायटी’ विविध शाळांमधून तरुणांना याविषयी सांगत आहे.
याहॅव म्हणाले, ‘या ठिकाणी २००९ मध्ये प्रथम आदरांजली वाहण्यात आली. त्या वेळी भारतीय जवानांच्या शौर्याचा हा इतिहास पुस्तकांमध्ये समाविष्ट केला जाईल, असे सांगितले गेले. आज येथील तरुणांना हा इतिहास माहीत झाला आहे.’
शेवटची ऐतिहासिक घोडदळाची लढाई
पहिल्या महायुद्धातील हैफा येथील लढाई जगप्रसिद्ध आहे. भारताच्या घोडदळाच्या रेजिमेंटने केवळ भाला आणि तलवारीच्या जोरावर ऑटोमनच्या सैन्याला अत्यंत कठीण अशा माउंट कार्मल येथून पिटाळून लावले होते. अतिशय प्रतिकूलतेचा सामना भारतीय जवानांना करावा लागला होता. ही लढाई इतिहासातील शेवटची उत्कृष्ट अशी घोडदळाची लढाई मानली जाते.
भारतामध्येही ‘हैफा डे’
भारतातही २३ सप्टेंबर हा दिवस दर वर्षी ‘हैफा डे’ म्हणून साजरा केला जातो. म्हैसूर, हैदराबाद आणि जोधपूर लान्सर्स या तीन घोडदळाच्या रेजिमेंटना आदरांजली अर्पण केली जाते. घोडदळाची ही मोहीम १९१८ मध्ये तत्कालीन १५ व्या ‘इंपिरिअल कॅव्हलरी ब्रिगेड’ने यशस्वी केली होती. इस्रायलमध्येही भारतीय दूतावासाकडून या दिवशी स्मतिस्थळाला आदरांजली अर्पण केली जाते.
या मोहिमेतील वीर
– कॅप्टन अमन सिंग बहादूर आणि दफादर जोर सिंग यांना ‘इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट’ सन्मान
– कॅप्टन अनुप सिंग आणि सेकंड लेफ्टनंट सगतसिंग यांना ‘मिलिटरी क्रॉस’
– हैफाच्या लढाईतील हिरो समजले जाणारे मेजर दलपत सिंग यांनाही ‘मिलिटरी क्रॉस’
– ‘जोधपूर लान्सर्स रेजिमेंट’चे आठ जवान हुतात्मा झाले आणि ३४ जखमी झाले. त्यांनी शत्रूचे ७०० सैनिक युद्धबंदी म्हणून पकडले. तसेच, १७ तोफा आणि ११ मशीन गनही हस्तगत केल्या.