इस्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे यशस्वी उड्डाण, पण उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाबद्दल संदिग्धता कायम

इस्रोचे नवे रॉकेट SSLVने अपेक्षित उड्डाण केले, मात्र उपग्रहांबद्दलच्या ठोस माहितीचे विश्लेषण इस्रो करत आहे

इस्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे यशस्वी उड्डाण, पण उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाबद्दल संदिग्धता कायम
इस्त्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे यशस्वी उड्डाण, पण उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाबद्दल संदिग्धता कायम

कमीत कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने अवघ्या काही दिवसा सज्ज होत उपग्रह प्रक्षेपण करणाऱ्या इस्रोच्या नव्या रॉकेटचे-प्रक्षेपकाचे-Small Satellite Launch Vehicle (SSLV)चे पहिले उड्डाण आज इस्रोच्या श्रीहरीकोटा तळावरुन यशस्वी पार पडले. नव्या रॉकेटने त्याचे काम चोख बजावले असले, रॉकेटच्या सर्व टप्प्यांनी अपेक्षित कामगिरी जरी केली असली, उपग्रह जरी प्रक्षेपित झाले असले तरी इस्रोने मोहिम पुर्ण झाल्याची घोषणा केलेली नाही.

इस्रोचा नवा प्रक्षेपक SSLV ची उंची ३४ मीटर असून व्यास दोन मीटर एवढा आहे. आज सकाळी नऊ वाजून १८ मिनीटांनी श्रीहरीकोटा इथून यशस्वीरित्या SSLV चे पहिले उड्डाण झाले. या मोहिमेला इस्रोने SSLV-D1 असं नाव दिलं होते. अवघ्या १०० टन वजनाचा SSLV हा नवा प्रक्षेपक फक्त सहा जणांची टीम अवघ्या सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करु शकते. यामुळे SSLV प्रक्षेपणाच्या माध्यमातून इस्रोची मनुष्यबळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे. ५०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हे ५०० किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करण्याची SSLVची क्षमता आहे. या प्रक्षेपकामुळे लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी मोठ्या प्रक्षेपकावर अवलंबुन रहाण्याची वेळ इस्रोवर येणार नाही.

या मोहिमेच्या माध्यमातून १३५ किलोग्रॅम वजनाचा EOS 02 नावाचा मायक्रो सॅटेलाईट ( microsatellite) ३५० किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केला जाणार आहे. या उपग्रहाचा कार्यकाल हा १० महिने निश्चित करण्यात आला असून जमिनीची छायाचित्रे काढण्याचे काम करणार आहे. तर ग्रामीण भागातील ७५० विद्यार्थ्यांनींनी बनवलेला आठ किलोग्रॅम वजनाचा AzaadiSAT नावाचा उपग्रहही प्रक्षेपित केला जाणार आहे.

आज काय झाले?

आज नव्या SSLV चे वेळेप्रमाणे उड्डाण झाले. नव्या प्रक्षेपकाच्या तीनही टप्प्यांनी अपेक्षित कामगिरी चोख बजावली. प्रक्षेपकाचे तीनही टप्पे पुर्ण झाले, उपग्रहांनी नियोजित उंचीही गाठली आणि उपग्रह ज्या भागावर आरुढ झाले आहेत त्या इंजिनाचा टप्पा सुरु झाला. त्यानंर दोन्ही उपग्रह प्रक्षेपितही झाले, मात्र हे उपग्रह नियोजित वेळेआधीच उपग्रह प्रक्षेपित झाले असावेत किंवा उपग्रह वेगळे होतांना काही तांत्रिक बिघाड झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी माहितीचे विश्लेषण सुरु असून उपग्रहांबद्दलची नेमकी माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगतिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Isro launch new rocket sslv successfully but doubts about satellites data asj

Next Story
कोलकात्यातील इंडियन म्युझियममध्ये CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, एकाचा मृत्यू तर एक जखमी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी