Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मनी लाँडरिंग अर्थात आर्थिक अफरातफर प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. जॅकलीनने न्यायालयात याचिका दाखल करुन ईडीने तिच्या विरोधात दाखल केलेली FIR रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. हे प्रकरण सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. जॅकलिन ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान या प्रकरणामुळे ती अनेकदा चर्चेत आली आहे. आता तिची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

जॅकलिनची मागणी नेमकी काय होती?

जॅकलिन फर्नांडिसने तिच्या याचिकेत ईडीने दाखल केलेली एफआयआर रद्द करावी अशी मागणी केली होती. तसंच कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशालाही याचिकेत आव्हान दिलं होतं. जॅकलीन फर्नांडिसने न्यायालयाला ही विनंतीही केली होती की तिच्या विरोधात सुरु असलेली कायदेशीर कारवाई थांबवण्यात यावी. मात्र न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाशी माझा संबंध नाही-जॅकलिन

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस म्हणाली की, तिचा या मनी लाँडरिंगशी काहीही संबंध नाही आणि सुकेशने मुद्दाम तिला टार्गेट केलं. जॅकलीनने म्हटलं की, सुकेशने केलेल्या त्या दाव्याला काहीही आधार नाही की दोघं रिलेशनशिपमध्ये होते. जॅकलीन म्हणाली सुकेशने माझ्याबाबत केलेले प्रेमाचे आणि नातं जोडल्याचे दावे खोटे आणि निराधार आहेत.

“आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, तसंच सुकेश चंद्रशेखरने जे काही दावे केले आहेत ते बिनबुडाचे आणि निराधार आहेत.”

जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिनचं नाव या प्रकरणात कसं आलं?

आर्थिक अफरातफरीचं हे प्रकरण २०२१ मध्ये समोर आलं होतं तिहारच्या तुरुंगातून एका मोठ्या घोटाळ्याची आखणी करणाऱ्या ठग सुकेश चंद्रशेखर विरोधात मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण नोंदवण्यात आलं. यात सुकेशवर २०० कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे. याबाबत जेव्हा सुकेशची कसून चौकशी झाली तेव्हा त्यांना जॅकलीन फर्नांडिस आणि इतर सेलिब्रिटींना महागडी गिफ्ट दिली होती अशी माहिती समोर आली. ही रक्कम सुकेशने अनेक सेलिब्रिटींना महागड्या भेटी पाठवण्यासाठी वापरली होती. त्यात जॅकलीनचं नाव प्रामुख्याने समोर आलं होतं. दरम्यान जॅकलीन आणि तिच्या कुटुंबाने सुकेशकडून कुठलंही गिफ्ट किंवा कुठलीही भेट वस्तू घेतली नाही असं म्हणत त्याचे दावे फेटाळले होते. दरम्यान ईडीने जॅकलीन फर्नांडिसच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. आता तो रद्द करण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.