Jagdeep Dhankhar To Vacate Vice President’s Official Residence: आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एका महिन्याने, जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज संध्याकाळी उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान रिकामे करून दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर इंडियन नॅशनल लोक दल (आयएनएलडी) प्रमुख अभय सिंग चौटाला यांच्या फार्महाऊसमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
२१ जुलै रोजी राजीनामा दिल्यापासून ७४ वर्षीय धनखड हे सार्वजनिपणे समोर आलेले नाहीत. “गेल्या महिन्यापासून ते उपराष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानातच असून, येथे ते त्यांच्या नातेवाईक आणि जुन्या मित्रांना भेटत आहेत. आज ते डॉक्टरांना भेटण्यासाठी बाहेर पडले होते”, असे एका सूत्राने सांगितले. उपराष्ट्रपतीपादाचा राजीनामा दिल्यानंतर ते पहिल्यांदाच उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानातून बाहेर पडले असल्याचेही सूत्राने सांगितले.
“धडखड यानी सुरक्षा यंत्रणांना कळवले आहे की, ते संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास छत्तरपूर एन्क्लेव्ह येथील गदाईपूर डीएलएफ फार्म्समधील एका खाजगी निवासस्थानात जाणार आहेत. त्यांचे बरेच सामान आधीच हलवण्यात आले आहे, तर अनेक घरगुती वस्तू उपराष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानातील फ्लॅटमध्ये हलवण्यात आल्या आहेत”, असे सूत्रांनी सांगितले.
चौटाला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धनकड त्यांच्या फार्महाऊसवर जात असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. “आमचे जुने कौटुंबिक संबंध आहेत. त्यांनी मला घर मागितले नव्हते तर, मी त्यांना घर देऊ केले”, असे ते म्हणाले.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्यापूर्वी धनखड यांना संसद भवन संकुलाजवळील उपराष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान सोडावे लागणार आहे. ते गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उपराष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानी राहायला गेले होते. दरम्यान, जोपर्यंत त्यांना सरकारी निवासस्थान मिळत नाही तोपर्यंत ते छत्तरपूर एन्क्लेव्हमध्येच राहतील.
गेल्या आठवड्यात, धनखड यांनी माजी आमदार म्हणून राजस्थान विधानसभा सचिवालयात पेन्शनसाठी पुन्हा अर्ज केला होता. १९९३ ते १९९८ दरम्यान राजस्थानच्या किशनगडचे माजी आमदार असलेले धनखड २०१९ पर्यंत आमदारकीची पेन्शन घेत होते. त्यानंतर त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पुढे २०२२ मध्ये त्यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.