पीटीआय, श्रीनगर
भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा शस्त्रविराम कायम राहायला हवा असे मत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी व्यक्त केले. सीमेवरील लोकांना शांततेत जगायचे आहे असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कुपवाडा जिल्ह्याच्या तांगधर भागात पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये नुकसान झालेल्या भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शस्त्रविरामाबद्दल आग्रही भूमिका मांडली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी काही वृत्तवाहिन्यांच्या निवेदकांवरही टीका केली. ते म्हणाले की, ‘‘आम्हा सर्वांना कायमस्वरूपी शस्त्रविराम हवा आहे. केवळ इधून दूर नोएडा किंवा मुंबईतील काही वृत्तवाहिन्यांच्या निवेदकांना शस्त्रविराम आवडत नाही. सीमेजवळ किंवा नियंत्रणरेषेजवळ राहणाऱ्या आणि जम्मू व श्रीनगरमधील परिस्थिती पाहिलेल्या लोकांना शस्त्रविराम हवा आहे.’’

शाळा, महाविद्यालये सुरू

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील सीमाभागातील जिल्हे वगळता सर्वत्र शाळा आणि महाविद्यालये मंगळवारी पुन्हा उघडली. शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर लष्करी संघर्ष थांबल्यानंतर शाळा सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यातील तसेच बांदीपुरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमधील शैक्षणिक संस्था बंद असल्याची माहिती देण्यात आली.