JD Vance Childrens in India : अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स त्यांच्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्यावर आले आहेत. आज (२१ एप्रिल) सकाळी १० वाजता त्यांचं विमान दिल्लीतील पालम एअरबेसवर दाखल झालं. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव यांनी व्हॅन्स यांचं यावेळी स्वागत केलं. व्हॅन्स यांचा हा दौरा खूप खास मानला जात आहे. अमेरिकेने जगभरातील देशांवर लावलेलं परस्पर आयात शुल्क, याच आयात शुल्कावरून चीनबरोबर सुरू असलेलं टॅरिफ वॉर आणि व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावर असलेलं जग पाहता अमेरिकेच्या उपाध्यक्षांचा हा भारत दौरा खूप महत्त्वाचा आहे.

अमेरिकेचे उपाध्यक्ष त्यांच्या पत्नीला व मुलांना घेऊन भारतात आले आहेत. अमेरिकेच्या सेकेंड लेडी उषा व्हॅन्स व त्यांची तीन मुलं, इवान, विवेक आणि मिराबेल देखील भारत भेटीवर आले आहेत. या तिन्ही मुलांनी विमानतळावर सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. कारण अमेरिकेन उपाध्यक्षांच्या मुलांनी भारतीय पोशाख परिधान केले होते. त्यांच्या मुलांनी कुर्ता-पायजमा व मुलीने अनारकली सुट परिधान केला होता.

उपाध्यक्षांच्या मुलीने वेधलं लक्ष

पालम एअरबेसवर अमेरिकन उपाध्यक्षांचं विमान उतरल्यानंतर व्हॅन्स यांची मुलं विमानातून पटापट खाली उतरली. मात्र त्यांची मुलगी तिचा अनारकली सूट सावरत हळूहळू पायऱ्या उतरण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात व्हॅन्स यांनी आपल्या कन्येला उचलून घेतलं. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व्हॅन्स कुटुंबाच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित होते. वैष्णव हे त्यावेळी व्हॅन्स यांची मुलगी व त्यांच्या मुलांबरोबर काहीतरी बोलताना दिसले.

अमेरिकेच्या सेकेंड लेडीची देखील चर्चा

व्हॅन्स यांच्या पत्नी उषा या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. त्यामुळेच त्या आपल्या मुलांना भारतीय पोशाखात घेऊन आल्या आहे. यावेळी उषा यांनी लाल रंगाचा मॅक्सी ड्रेस व्हाइट ब्लेझरबरोबर पेअर केला होता. तर, व्हॅन्स यांनी पांढरा शर्ट व त्यावर काळा सूट परिधान केला होता. व्हॅन्स कुटुंबीयांचे एअरबेसवरील फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

भारत व अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार करारांना अंतिम स्वरूप दिलं जाणार

व्हॅन्स यांच्या या भारत दौऱ्यात अमेरिका व भारत या दोन्ही देशांमधील संबंध बळकट करणे, द्विपक्षीय व्यापार वाढवणे, द्विपक्षीय व्यापार करारांना अंतिम स्वरूप देणे आदी महत्वाच्या विषयांवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेडी व्हॅन्स यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.