‘हिटलरचा बाप’ म्हणत आव्हाडांची योगींवर टीका; म्हणाले, “विद्यार्थ्यांची ‘संपत्ती’ जप्त करण्याचे आदेश…”

“आरआरबी एनटीपीसीच्या परीक्षेसाठी एकूण सीट होत्या जवळपास ३८ हजार, अर्ज आले होते तब्बल सव्वा कोटी. हे भयाण वास्तव आहे देशातील रोजगारांचं.”

Yogi Government
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयावर केली टीका

रेल्वे भरती बोर्डाने म्हणजेच आरआरबीने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीअंतर्गत (एनटीपीसी) नोकरभरतीसाठी घेतलेल्या परीक्षांच्या मुद्द्यांवरुन उत्तर प्रदेश बिहारमध्ये हिंसक घटना घडत आहेत. रेल्वेच्या परीक्षांवरुन सुरु झालेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हिंसक वळण मिळालं आहे. २६ जानेवारी रोजी सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेच्या या परीक्षेवरुन राज्यामध्ये गोंधळाची स्थिती दिसून आली.

भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं अनेक ठिकाणी परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाठीचार्जचाही आरोप केलाय. बिहारमधील गयामध्ये या आंदोलनातील तरूणांनी एका ट्रेनवर दगडफेक करत ट्रेनला आग लावल्याचीही घटना घडली उत्तर प्रदेशमध्येही या आंदोलनाचं लोण पसरलं असून विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधलाय.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार रेल्वे भरती बोर्डाने म्हणजेच आरआरबीने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीअंतर्गत (एनटीपीसी) नोकरभरतीसाठी सीबीटी-२ परीक्षाचे निकाल १४ आणि १५ जानेवारी २०२२ रोजी जारी केले. त्याच्या आधारे सीबीटी-२ म्हणजेच दुसऱ्या टप्प्याची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने उमेदवारांची यादी निश्चित करणं आवश्यक होतं. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आरआरबी एनटीपीसीचा निकाल देताना घोटाळा करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.

नक्की वाचा >> Bihar Violence: विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवून दिली; YouTube फेम खान सरांसहीत ४०० जणांविरोधात FIR दाखल

याच मुद्द्यावरुन बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरु झाले आणि पाहता पाहता ते उत्तर प्रदेशपर्यंत पसरलं आहे. रेल्वे भरती बोर्डाविरोधात विद्यार्थ्यांनी रेल्वे मार्ग रोखून धरले आहेत. बिहारमधील गया जिल्ह्यात बुधवारी याच आंदोलनादरम्यान एका ट्रेनला आंदोलक विद्यार्थ्यांनी आग लावली, तर उत्तर प्रदेशमध्येही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या ट्रॅकवर उतरुन आंदोलन केलं.

आव्हाड काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड यांनी हिटलरचा बाप या हॅशटॅगसहीत एक ट्विट केलंय. “उत्तर प्रदेशातील आंदोलक विद्यार्थ्यांची ‘संपत्ती’ जप्त करण्याचे आदेश योगी सरकारने दिलेत. त्यांच्याकडे संपत्ती असती तर नोकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरले असते का? बहुधा त्यांची पेनं, पुस्तकं आणि पदव्या जप्त करतील,” असा टोला आव्हाड यांनी ट्विटरवरुन लागवला आहे.

अन्य एका ट्विटमध्ये आव्हाड यांनी ज्या परीक्षेवरुन वाद झालाय त्यामध्ये किती जणांनी अर्ज केलेल्या यासंदर्भातील बातमीचा स्क्रीनशॉर्ट पोस्ट करत सरकारवर बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन टोला लगावलाय.

“आरआरबी एनटीपीसीच्या परीक्षेसाठी एकूण सीट होत्या जवळपास ३८ हजार, अर्ज आले होते तब्बल सव्वा कोटी. हे भयाण वास्तव आहे देशातील रोजगारांचं. बेरोजगारीचा हा स्फोट देशात अराजक माजवू शकतो. वेळीच सावध होवून तरुणांच्या हातांना काम द्या. त्यांच्या स्वप्नांच्या सोबत खेळू नका,” असं आव्हाड म्हणालेत.

सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हिंसेनंतर राज्याच्या राजधानीमधील पत्रकार नगर पोलीस स्थानकात अटकेत असणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवण्यात आला. या जबाबाच्या आधारे सोशल नेटवर्किंगवरुन प्रसिद्ध झालेले खान सर आणि इतर काही संस्थांबरोबरच एकूण ४०० जणांविरोधात पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jitendra awhad slams yogi adityanath and government for unemployment over issue of rrb ntpc exam violence in bihar uttar pradesh scsg

Next Story
जबरदस्ती धर्मांतरामुळे आत्महत्या केलेल्या ‘त्या’ मुलीचा व्हिडीओ आला समोर; हॉस्टेलमध्ये काम करायला लावण्यासह अनेक गंभीर आरोप
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी