Karnataka : देशभरात गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याच्या अनेक बातम्या समोर येत असल्याचं पाहायला मिळतं. आता कर्नाटकात देखील एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका १५ वर्षांच्या मुलीवर २ महिन्यांत दोनदा सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
कर्नाटकातील बेलगावी येथे एका मुलीवर डिसेंबरमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. ६ गुन्हेगारांनी एका निर्जनस्थळी तिच्यावर अत्याचार केला आणि ही घटना आरोपींनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर जानेवारीमध्ये त्यापैकी तीन आरोपींनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी एफआयआर दाखल करत कारवाई केली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
या प्रकरणाबाबत बोलताना पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, या प्रकरणातील संवेदनशील तपशील सध्या उघड करता येणार नाही. आम्ही ५ आरोपी ताब्यात घेतले आहेत, तर एक आरोपी फरार आहे. मुलगी अल्पवयीन असून आम्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणाची कोणतीही ओळख आणि सखोल माहिती सध्या तरी आम्ही उघड करू शकत नाहीत”, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, “एका आरोपीने या मुलीशी आधी मैत्री केली. त्यानंतर तिला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. त्यानंतर त्या ठिकाणी त्याने त्याच्या काही मित्रांना बोलावलं. त्यानंतर या आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना डिसेंबरमध्ये घडली. त्यानंतर आरोपींनी मोबाईलमध्ये या कृत्याचं व्हिडीओ चित्रीकरण केलं. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्यापैकी तिघांनी पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. ही घटना जानेवारीत घडली.
दरम्यान, ही घटना आता उघडकीस आली असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्व आरोपी १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. तसेच पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. तसेच फॉरेन्सिक टीम सर्व नमुने आणि पुरावे गोळा करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.