Kerala Woman : Kerala Woman : एका विवाहितेचा मृतदेह तिच्या शारजा येथील घरात आढळून आला आहे. ही महिला मूळची केरळची होती. विपनचिका मनियान असं या महिलेचं नाव होतं. हुंडा आणि मानसिक छळ याला कंटाळून तिने आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा नवरा आणि सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

८ जुलैला घडली घटना

८ जुलैला संयुक्त अरब अमिरातच्या शारजामध्ये विपनचिका या महिलेचा मृतदेह आढळून आला. तिची एक वर्षांची मुलगीही मृतावस्थेत आढळली. एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू कसा झाला याचा अहवाल समोर आल्यानंतर तिचा मृत्यू हा श्वास कोंडल्याने झाला. विपनचिकाने आधी मुलीला मारलं असावं आणि त्यानंतर टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांना या ठिकाणी सुसाईड नोटही सापडली आहे. रोज हुंड्यासाठी केला जाणारा छळ, शिवीगाळ आणि मानसिक त्रास याला कंटाळून आत्महत्या केल्याचं यात विपिनचिकाने म्हटलं आहे.

पोलिसांनी निध्धीश आणि त्याच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा केला दाखल

पोलिसांनी विवाहितेचा नवरा निध्धीश आणि त्याच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विपिनचिकाच्या आईने केरळमध्ये तिच्या सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. माझ्या मुलीला हुंड्यासाठी छळण्यात येत होतं असा आरोपही विपिनचिकाची आई श्यामला यांनी केला आहे. २०२० मध्ये विपिनचिका आणि निध्धेश यांचा विवाह झाला होता. त्यानंतर हे दोघंही शारजाला शिफ्ट झाले होते. मात्र तिचा हुंड्यासाठी छळ केला गेला, असा आरोप विपनचिकाच्या आईने केला आहे.

विपनचिकाच्या नवऱ्यावर तिच्या आईचे गंभीर आरोप

विपनचिकाला तिचे केसही तिच्या नवऱ्याने कापायला लावले होते. तू आकर्षक दिसत नाहीस केस काप असं म्हणत तिला सक्तीने केस कापण्यास भाग पाडण्यात आलं होतं, तिला मारहाण केली जात होती तसंच तिचा पैशांसाठी छळ करण्यात येत होता असंही तिच्या आईने म्हटलं आहे. एवढंच नाही तर माझ्या मुलीच्या नवऱ्याचे दुसऱ्या स्त्री सोबत प्रेमसंबंध आहेत त्यामुळेच माझ्या मुलीचा छळ करण्यात येत होता. माझी एक वर्षाची नात वैभवी हिलाही छळण्यात आलं असाही आरोप श्यामला यांनी केला. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये खटके उडत होते त्यामुळे माझी मुलगी आणि तिचा नवरा दोघंही काही महिन्यांपासून वेगवेगळ्या घरांमध्ये राहात होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. विपिनचिकाचा नवरा आणि त्याच्या घरातल्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.