Khesari Lal Yadav Nomination Affidavit Net Worth : भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव सध्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. अशातच त्याने राजकारणात एंट्री घेतली आहे. शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) त्याने बिहारमधील छपरा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्याने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे.

खेसारी लाल यादव हा भोजपुरी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रियक गायक व अभिनेता आहे. राष्ट्रीय जनता दलाने त्याला बिहारमधील सारण जिल्ह्यातील छपरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. खेसारीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षात प्रवेश केला आहे. खेसारीबरोबर त्याची पत्नी चंदा हिने देखील राजदमध्ये प्रवेश केला आहे.

खेसारी लाल यादवची एकूण संपत्ती किती?

खेसारी लाल यादवने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्याकडे २४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये १६.८९ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता व ७.९१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्याच्या पत्नीकडे ९० लाख रुपयांची जंगम मालमत्ता व ६.४९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. खेसारीकडे रोख ५ लाख रुपये तर त्याच्या पत्नीकडे २ लाख रुपये आहेत. त्याची अनेक बँकांमध्ये खाती आहेत. यादव दाम्पत्याकडे ३५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.

खेसारी लाल यादवकडे ३ कोटी रुपयांच्या आलिशान गाड्या देखील आहेत

गरिबीतून पुढे आल्याचा दावा

खेसारी लाल यादवने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्याने पाच हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. खेसारीचं म्हणणं आहे की तो एका गरीब कुटुंबातून इथवर आला आहे. त्याचे वडील रस्त्याकडे एक छोटे विक्रेते होते. तसेच ते रात्री एका ठिकाणी सुरक्षारक्षकाची नोकरी करत होते. कुटुंबाची आर्थिक मदत व्हावी यासाठी मी गुराख्याचं काम करायचो असंही खेसारी सांगतो. तसेच तो काही वर्षे दुध विकायचा. त्यानंतर त्याने दिल्लीत लिट्टी-चोखा विकायचा. दिल्लीत लिट्टी-चोखा विकत असताना त्याचं नशीब पालटलं आणि त्याला भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करायची संधी मिळाली. आज त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्याच्याकडे आलिशान गाड्या व बंगला देखील आहे.