KIIT University Odisha : ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे ओडिशात मोठी खळबळ उडाली आहे. मृत विद्यार्थिनी ही नेपाळची रहिवासी असल्याची माहिती सांगितली जात आहे. प्रकृति लमसाल असं तिचं नाव आहे. ती बी.टेकच्या तृतीय वर्षात शिकत होती. ही घटना समोर आल्यानंतर कलिंगा इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेपाळी विद्यार्थिनीच्या आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर कॅम्पसमधील नेपाळी विद्यार्थ्यांनी विरोध करत आवाज उठवला आणि निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. तसेच नेपाळी विद्यार्थ्यांनी निदर्शने करत मुलीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलाला अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे कॅम्पसमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र, यानंतर ५०० हून अधिक नेपाळी विद्यार्थ्यांना भुवनेश्वरमधील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) चे कॅम्पस सोडण्यास सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

नेपाळी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने वसतिगृहातून बाहेर काढल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल असं वाटताच विद्यापीठाने एक नोटीस जारी करत नेपाळमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत विद्यापीठ बंद असून विद्यार्थ्यांना विद्यापीठ कॅम्पस तातडीने रिकामे करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप नेपाळी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे. वृत्तानुसार नेपाळी विद्यार्थ्यांना विद्यापीठापासून ३० किमी अंतरावर असलेल्या कटक रेल्वे स्थानकावर नेण्यात आलं. तेथून काही जण घरी गेले तर काहींना तिकीट उपलब्ध न झाल्याने विद्यार्थी रेल्वे स्थानकावरच अडकून पडले.

दरम्यान, कलिंगा इन्स्टिट्यूटच्या जनसंपर्क विभागाकडून या घटनेबाबत निवेदन जारी करण्यात आलं. त्यामध्ये विद्यार्थिनीने वैयक्तिक वाद वादामुळे हे पाऊल उचललं असावं असं म्हटलं आहे. या विद्यार्थिनीचे एका विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि तिने हे पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात भुवनेश्वरचे पोलिस उपायुक्त पिनाक मिश्रा यांनी सांगितलं की, “आम्हाला १६ फेब्रुवारी रोजी एका नेपाळी विद्यार्थिनीच्या आत्महत्येबद्दल पोलीस तक्रार मिळाली होती. आम्ही ताबडतोब वसतिगृहाच्या खोलीत पोहोचलो आणि या घटनेमुळे चिडलेल्या विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच मुलीचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.”

विद्यापीठाने नेपाळी विद्यार्थ्यांना काय आवाहन केलं?

कलिंगा इन्स्टिट्यूटने एका निवेदनात म्हटलं की, “कॅम्पसमध्ये काल संध्याकाळी उशिरा एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास करून आरोपीला अटक केली. कलिंगा इन्स्टिट्यूट प्रशासनाने शैक्षणिक वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी कॅम्पस आणि वसतिगृहांमध्ये सामान्य स्थिती प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. सर्व नेपाळी विद्यार्थ्यांना आमचं आवाहन आहे की, ज्यांनी कॅम्पस सोडण्याची योजना आखली आहे त्यांनी पुन्हा परत येऊन वर्ग सुरु करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे”, असं इन्स्टिट्यूटने म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiit university odisha 500 nepali students were asked to leave the university after protesting the death of a nepali student gkt