कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या आणि इंग्लंडच्या परराष्ट्र सचिव लिज ट्रस यांनी पक्षांतर्गत पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांचा पराभव केला. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यानंतर त्या ब्रिटनच्या पंतप्रधान होतील. मंगळवारी (६ सप्टेंबर) त्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असणार आहेत. त्यांच्याआधी हा मान थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांना मिळाला होता.

कोण आहेत लिज ट्रस?

४७ वर्षीय लिज ट्रस याचं कुटुंब डाव्या विचारसरणीचं आहे. त्यांचं बालपण स्कॉटलंड आणि उत्तर इंग्लंडमध्ये गेलं. त्यांचा राजकीय प्रवास डाव्या विचारसरणीपासून उजवी विचारसरणीकडे झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी लिबरल डेमॉक्रेट्समध्ये सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी इंग्लंडमधील राजेशाही बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर १९९६ मध्ये त्यांनी उजवी विचारसरणीच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षात प्रवेश केला. पुढे त्यांनी शेल या ऑईल कंपनीत काम केलं.

२०१० मध्ये लिज ट्रस यांनी सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला. यानंतरच्या काळात त्यांच्याकडे विविध मंत्रालयाच्या जबाबदाऱ्याही आल्या. बोरिस जॉन्सन पंतप्रधान असताना त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या काळात जॉन्सन पंतप्रधान असताना त्यांच्याच पक्षातील अनेक नेत्यांनी बंड करत त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं. या सर्व परिस्थितीत लिज ट्रस जॉन्सन यांच्यासोबत राहिल्या.

ट्रस २०१४ पासून सरकारमध्ये आहेत. त्यांनी मधल्या काळात अनेक पदांवर काम केलं. त्या आधी न्याय सचिव होत्या, पुढे त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय व्यापार सचिवपद आलं. २०२१ मध्ये त्यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती झाली. ब्रिटनच्या परराष्ट्र सचिव होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या.

२०१६ मध्ये लिज ट्रस यांनी ब्रिटनने युरोपियन युनियन सोडण्याविरोधात मतदान केलं. त्यांनंतर त्यांनी आपलं आधीच वक्तव्य चूक असल्याचं म्हणत ब्रेक्झिटला पाठिंबा दर्शवला. ट्रस यांचा कमी कर आकारणी आणि लहान राज्यांना पाठिंबा आहे.

हेही वाचा : ब्रिटनचा ट्रस्ट लिज ट्रस यांच्यावरच! पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक पराभूत

घोटाळ्यांचा आरोप झाल्यानंतर जॉन्सन यांनी जुलै २०२२ मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षात पंतप्रधानपदासाठी निवडणूक झाली आणि लिज ट्रस विजयी झाल्या.