Ladakh DGP 0n Sonam Wangchuk : पर्यावरणवादी कार्यकर्ते व लडाख राज्यासाठीच्या आंदोलनात अग्रभागी असलेल्या सोनम वांगचुक यांना शुक्रवारी लेहमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. लेहमध्ये बुधवारी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान यानंतर आज (शनिवार) लडाखचे पोलीस महासंचालक (DGP) एस. डी. सिंग जामवाल यांनी वांगचुक यांचे पाकिस्तानशी संबंध असणे आणि भारताच्या शेजारच्या देशांना दिलेल्या भेटींबाबत चिंता व्यक्त केली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
लेह येथे आयोजित पत्रकार परिषदेत डीजीपी जामवाल यांनी सांगितले की, पोलिसांनी एका पाकिस्तान पीआयओ (इंटेलिजन्स ऑफिसर) ला अटक केली आहे, जो कथितपणे वांगचुक यांच्या संपर्कात होता. “आम्ही काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी पीआयओला अटक केली होती, जो तिकडे माहिती पुरवत होता. आमच्याकडे याचे रेकॉर्ड आहे. ते (सोनम वांगचूक) पाकिस्तानमध्ये डॉन (वर्तमानपत्र)च्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी बांगलादेशला देखील भेट दिली. त्यामुळे, त्यांच्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह आहे. याप्रकरणी तपास केला जात आहे,” असे लडाखचे डीजीपी म्हणाले.
तसेच पुढे बोलताना २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारात वांगचुक यांनी हिंसाचार भडकावल्याचा आरोपही जामवाल यांनी केला. या घटनेत आंदोलकांनी हिंसाचार आणि जाळपोळ करून स्थानिक भाजपाचे कार्यालय आणि काही वाहनांना आग लावल्याने किमान चार जणांचा मृत्यू झाला होता आणि जवळपास ८० जण जखमी झाले होते.
“सोनम वांगचुक यांना चिथावणी देण्याचा इतिहास राहिलेला आहे. त्यांनी अरब स्प्रिंग, नेपाळ आणि बांगलादेशचा उल्लेख केला आहे. तसेच एफसीआरए उल्लंघनासाठी त्यांना मिळालेल्या निधीची चौकशी सुरू आहे,” असे ते म्हणाले.
लेह येथील हिंसाचारामध्ये परकीय शक्तींचा हात असल्याबद्दल विचारले असता डीजीपी म्हणाले की, “तपासादरम्यान, आणखी दोन लोकांना पकडण्यात आले होते. जर ते या कटाचा भाग असतील, तर मी सांगू शकत नाही. या ठिकाणाला नेपाळी लोक मजूर म्हणून काम करत असल्याचा इतिहास राहिला आहे, त्यामुळे आम्हाला तपास करावा लागेल,” असे जामवाल म्हणाले. तसेच पुढे बोलताना डीजीपी जामवाल म्हणाले की, तथाकथित पर्यावरण कार्यकर्त्याने चिथावणीखोर भाषणे दिली होती, ज्यामुळे लडाखमध्ये हिंसाचार झाला.