देशभरात विरोधी पक्ष कमकुवत झाल्याची टीका केली जात आहे. अनेक राजकीय विश्लेषकांकडून आणि काही राजकीय पक्षांकडून देखील काँग्रेसमधील नेतृत्वाच्या अभावावर देखील बोट ठेवलं जात आहे. या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वीच सुटका झालेले राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी देशाची राजकीय परिस्थिती आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी काय करावं लागेल, याविषयी आपली भूमिका मांडली आहे. यासोबतच, त्यांनी भाजपाची तुलना थेट जंगली पशूसोबत करून नवा वाद निर्माण केला आहे.

“भाजपा हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद घडवतंय”

लालू प्रसाद यादव काही महिन्यांपासून तुरुंगातून सुटल्यानंतर दिल्लीतच होते. नुकतेच ते बिहारमध्ये परतले असून पाटण्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली. भाजपाच्या तोंडाला आता रक्त लागलं आहे. ते हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भांडणं लावून त्यांच्यात वाद निर्माण करत आहेत, असं लालू प्रसाद यादव यावेळी म्हणाले.

लखीमपूर खेरीवरून टीकास्त्र

लालू प्रसाद यादव यांनी यावेळी बोलताना लखीमपूर खेरी इथे घडलेल्या घटनेवरून देखील भाजपावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात ८ जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रांच्या गाडीने काही शेतकऱ्यांना उडवल्यानंतर हा हिंसाचार झाला. यावेळी गाडी अजय मिश्रा यांचा मुलगा चालवत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर लालू प्रसाद यादव यांनी टीका केली आहे. “या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो”, असं ते म्हणाले.

लखीमपूर खेरी हिंसाचार: “माझा मुलगा तिथे असल्याचा पुरावा मिळाला तर मी…”; भाजपा मंत्र्याचं जाहीर आव्हान

भाजपाच्या पराभवासाठी लालूंचं गणित

दरम्यान, यावेळी लालूप्रसाद यादव यांनी भाजपावर टीका करतानाच विरोधी पक्षांमधील मतभेदांवर देखील बोट ठेवलं. भाजपाला पराभूत करणं शक्य असल्याचं सांगताना लालू प्रसाद यादव म्हणाले, “देशातील विरोधी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. जर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले, तर देशात भाजपाला पराभूत करता येऊ शकतं”, असं ते म्हणाले.

लालू प्रसाद यादव यांना २०१३ मध्ये कोणतीही निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली होती. चारा घोटाळा प्रकरणी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वीच ते तुरुंगातून सुटून बाहेर आले आहेत. याच प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतर लालूप्रसाद यादव यांना १९९७ मध्ये बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून देखील पायउतार व्हावं लागलं होतं.