नवी दिल्ली : दिल्लीतील २०२०च्या दंगलप्रकरणी अटकेत असलेल्या उमर खालिद, शारजील इमाम, गुलफिशा फातिमा आणि मीरन हैदर यांच्या जामीनअर्जावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली. उमर खालिदसह चौघांच्याही जामीनअर्जावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्या. अरविंद कुमार आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने पोलिसांना दिले. याचिकाकर्ते हे विद्यार्थी असून ते गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगत आहेत, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २७ ऑक्टोबरला होणार आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७००हून अधिक लोक जखमी झाले होते. दिल्ली पोलिसांनी खालिद, इमाम यांच्यावर मुख्य सूत्रधार म्हणून कट रचल्याचा आरोप ठेवला आहे. त्या दोघांसह अन्य आरोपींविरोधात ‘यूएपीए’ कायद्यांतर्गत दिल्ली पोलिसांनी कारवाई केली होती. त्यांचा जामीन नाकारताना दिल्ली उच्च न्यायालयाने शांततापूर्ण वातावरणात आणि कोणत्याही शस्त्रांशिवाय निदर्शने, आंदोलन करण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार मान्य केला होता.

यादव कुटुंबात बेबनावाचे खंडन

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात सत्तास्थानावरून बेबनाव निर्माण झाल्याच्या चर्चांचे सोमवारी खंडन करण्यात आले. यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी आपल्याला कोणत्याही राजकीय महत्त्वाकांक्षा नाहीत, असे सांगितले. “माझ्याविरोधात ट्रोल, माध्यमे आणि दुष्ट हेतू असलेले काही जण अफवा पसरवत आहेत,” असा आरोप त्यांनी रविवारी रात्री उशिरा एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये केला. रोहिणी यांनी लिहिले आहे की, “मला राज्यसभेची जागा किंवा विधानसभा निवडणुकीच्या तिकिटामध्ये कोणताही रस नाही. किंवा, कोणत्याही इच्छुकाला मी पाठिंबा दिलेला नाही. कुटुंबातील कोणाहीबरोबर माझी स्पर्धा नाही. भविष्यातील सरकारमध्ये मला कोणतीही जागा नको. माझ्यासाठी आत्मसन्मान, माझ्या पालकांप्रति माझे समर्पण आणि माझ्या कुटुंबाचा सन्मान सर्वात महत्त्वाचा आहे.” रोहिणी आचार्य सध्या सिंगापूरमध्ये राहतात. त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत सरण मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. राजकारणात तेजस्वी यादव यांचे वाढते महत्त्व रोहिणी यांना मान्य नसल्याच्या काही पोस्ट एक्सवर करण्यात आल्या होत्या. त्यावर त्यांनी रविवारी रात्री उशिरा खुलासा करणारी पोस्ट केली.

पाकिस्तानात स्फोट, २४ ठार

पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये एका कुंपणाच्या आवारात स्फोट होऊन २४ जणांचा मृत्यू झाला. हे कुंपण आणि स्फोट झालेली जागा तालिबानच्या मालकीची होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने साठवलेल्या स्फोटक साहित्याचा स्फोट झाला. त्यामध्ये अनेक जण जखमीही झाले. मात्र, स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या कुंपणाचा हवाई हल्ल्यामध्ये स्फोट झाला. त्यामुळे या घटनेबद्दल शंकाकुशंका उपस्थित होत आहेत. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर जिल्ह्यातील तिरा खोऱ्यात मातुर दारा या भागात ही जागा आहे. मात्र, या घटनेबद्दल सरकारकडून अधिकृतरित्या कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. पाकिस्तानच्या ‘तेहरिक ए इन्साफ’ या पक्षाच्या प्रांत शाखेने दावा केला की, तिरा खोऱ्यात विमानातून बॉम्ब टाकण्यात आले. त्यामध्ये पाच घरे उद्ध्वस्त झाली. मात्र, स्थानिक प्रशासनाने हवाई हल्ल्याचे दावे फेटाळून लावले.