लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. प्रचारावेळी प्रत्येक नेता विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही जातीचा मुद्दा समोर आला आहे. महाराष्ट्रातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला मागास जातीच्या वर्गातील संबोधले होते. यावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रियंका गांधी यांना प्रश्व विचारला असता त्या म्हणाल्या की, मला अजूनही मोदींची जात माहीत नाही. विरोधी पक्षाने अथवा नेत्यांनीही याबद्दल कोणतेही विधान केलेले नाही.

रविवारी प्रियंका गांधी यांनी प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादाच्या मुद्यावरुन टीका केली. त्या म्हणाल्या की, काँग्रेस आणि विरोधी पक्ष हा केवळ विकासाच्या मुद्यावरून सरकारला प्रश्न विचारतोय. आम्ही कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही.

काय म्हणाले होते पंतप्रधान –
मी मागास जातीतला असल्यामुळे विरोधकांना मी पंतप्रधान म्हणून मान्य नाही. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेत म्हणाले होते. शनिवारी उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथीलत प्रचारसभेत मोदींनी पुन्हा एकदा त्यांच्या जातीवरुन भाष्य केले. तुम्ही लोक (विरोधक) मला बोलायला लावत आहात, म्हणून मी जातीबद्दल बोलतोय. नाहीतर मी या राजकारणात न पडणारा व्यक्ती आहे.