Girish Kuber on Russian Oil and Trump Tariff: रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्क लादण्याची घोषणा ७ ऑगस्ट रोजी केली होती. त्यापूर्वी त्यांनी जुलैच्या अखेरीस भारतीय वस्तूंवर २५ टक्के आयातशुल्क लादले होते. रशियाकडून आपण मोठ्या प्रमाणात तेल आयात केल्यामुळे भारताला आणि देशातील सामान्यांना नेमका किती लाभ होतो? दूरगामी वाटचालीत अमेरिकेला नाराज करून भारताला तोटा होणार की लाभ? रशिया भारताचा खरोखरच घनिष्ठ मित्र आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘दृष्टिकोन’ या व्हिडीओ मालिकेतून दिली आहेत.
रशियाकडून तेल आयात केल्यामुळे किती लाभ?
गिरीश कुबेर यांनी म्हटले, “रशियाकडून कच्चे तेल आयात केल्यामुळे भारताचा २५ अब्ज डॉलर्सचा खर्च वाचलेला आहे. जर ही आयात थांबवली गेली असती, तर एवढा भरमसाठ खर्च करावा लागला असता. खर्च वाचला असला तरी यातून दोन प्रश्न निर्माण होतात. रशियाकडून आपण कच्चे तेल आयात केल्यामुळे सामान्यांना काही दिलासा मिळतोय का? तर तसे अजिबात नाही. सामान्यांना तेवढेच पैसे खर्च करावे लागत आहेत.”
“जर आपण २५ अब्ज डॉलर्स वाचवत असू, तर त्याचा फायदा भारतीय ग्राहकांना व्हायला हवा होता; पण ग्राहकांना महाग तेल विकले जात आहे. स्वस्त तेल विकत घेऊन, महाग विकणाऱ्या कंपन्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. त्यांच्यावर आम्ही अतिरिक्त कर (विंडफॉल) लावू, असे भारत सरकारने म्हटले असले तरी काही तज्ज्ञांच्या मते, ही अतिरिक्त कराची रक्कम ४०-४४ हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. भारताचे २५ अब्ज डॉलर्स वाचले असतील, तर अर्थात तेवढाच कुणाचा तरी नफा झालेला आहे आणि त्यावर त्यांना जो अतिरिक्त कर द्यावा लागतो, तो फक्त ४०-४४ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यातील तपशील नेमका बाहेर येऊ शकलेला नसला तरी ही रक्कम अपेक्षित असल्याचे गिरीश कुबेर यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यास…
“ट्रम्प यांनी अतिरिक्त टॅरिफ लावल्यास आपली आर्थिक गणिते बिघडू शकतात. आपल्याला महाग तेल विकत घ्यावे लागू शकते आणि महाग तेल विकत घेतल्यानंतर आपण तेलाचे दर वाढवतोच. करोना काळात तेलाचे दर अतिशय खाली आले होते. तरीही सामान्यांसाठी पेट्रोल-डिझेलचे दर खाली आले नव्हते. भारत सरकारने तेव्हा तीन-सव्वा तीन लाख कोटी रुपये वाचवले. त्यातून सामाजिक योजना राबविल्या गेल्या”, अशी माहिती त्यांनी दिली.
रशिया भारताचा मित्र आहे?
दुसरा मुद्दा असा की, रशिया आपला मित्र आहे, अशी हास्यास्पद भूमिका आपण मांडत आलो आहोत, असे गिरीश कुबेर यांनी सांगितले. “इतिहासात त्यांनी आपल्याला मदत केली किंवा अमेरिकेच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली, असे मुद्दे मांडले जातात. सोप्या भाषेत सांगायचे, तर हे अतिशय बालिश विधान आहे. त्याचे कारण असे की, पुतिन यांच्यासारखी थंड रक्ताची व्यक्ती राष्ट्राध्यक्ष असते तेव्हा ती अमेरिकेसारख्या देशाला किती नाचवू शकते, हे आपण आता अलास्काच्या शिखर परिषदेत पाहिले.
पुतिन यांच्याकडून आपण तेल घेणे बंद केले, तर साधारण सूर असा आहे की, पुतिन रागावतील वगैरे… पण यापैकी काहीही होणार नाही. यातली साधी गोष्ट म्हणजे एप्रिल-मे महिन्यात आपला पाकिस्तानशी संघर्ष झाला. तेव्हा रशियाने भारताच्या बाजूने एक चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे रशिया आपला मित्र असल्याचे मानून हे करावे लागते, असा भ्रामक समज बाळगण्याचे कोणतेही कारण नाही, असेही गिरीश कुबेर म्हणाले.
अमेरिकाच भारताचा पाठीराखा
गिरीश कुबेर पुढे म्हणाले, “जर या सगळ्या खेळामध्ये खरोखरच आपल्या बाजूने कोण मदतीसाठी उभे राहणार असेल, तर तो अमेरिका आहे. तो राहील की नाही, हा मुद्दा वेगळा आहे. पण, अमेरिकेवर खरोखरच आपली आर्थिक भिस्त आहे. त्यामुळे ट्रम्प कितीही वेडेवाकडे बोलले तरी आपण त्यांना धडा शिकविण्यासाठी चीनशी जवळीक साधायची वगैरे असल्या हास्यास्पद मार्गाने काही साध्य होणार नाही. अमेरिका हा जोपर्यंत अमेरिका आहे, तोपर्यंत त्यांच्याशी जुळवून घेणे हे आपल्यासाठी अत्यावश्यक ठरणार आहे.
अमेरिकेबरोबर जी व्यापारी कराराची कोंडी झालेली आहे. ती आपल्याला लवकर फोडावी लागेल. तसेच पुतिन यांच्यावर प्रेम दाखवून आपण रशियाकडून जे तेल आयात करत आहोत, तेही घेणे बंद करावे लागेल. ज्यावेळी आपण रशियाकडून तेल घ्यायला सुरुवात केली तेव्हा प्रति पिंप २० डॉलरचा फरक होता. आता तो दोन डॉलरवर आला आहे. दोन डॉलरसाठी आपण ट्रम्प यांच्याकरिता रक्त आटवण्यात अर्थ नसल्याचे कुबेर यांनी म्हटले आहे.
शेवटी गिरीश कुबेर म्हणाले की, अमेरिकेचे जे वेडाचार सुरू आहेत, ते लवकरात लवकर संपवून आपल्याला समोर येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. ते अधिक शहाणपणाचे ठरेल. अन्यथा, रशिया, अमेरिका व चीन यांच्यातील खेळाच्या बाबतीत आपण वर्षांनुवर्ष फक्त बघे राहिलेलो आहोत, तसेच आताही राहू.