Madhya Pradesh Crime News Woman kidnapped during Garba practice : मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अनेक लोकांच्या उपस्थितीत एका मोठ्या सभागृहात गरब्याचा सराव करत असलेल्या एका महिलेचं सहा जणांनी मिळून अपहरण केलं आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या सासरच्या आणि माहेरच्या नातेवाईकांनी मिळून हे अपहरण केलं आहे. महिला ज्या सभागृहात गरब्याचा सराव करत होती तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सदर घटना कैद झाली आहे. महिलेच्या अपहरणाचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हे विवाहबाह्य संबंधाचं प्रकरण असल्याचं प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी सांगितलं आहे.
मंदसौरमधील खानपुरा येथील भावसार धर्मशाळा परिसरातून या महिलेचं अपहरण करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. येथील मैदानात अनेक महिला आणि तरुणी गरबा खेळण्याचा सराव करत होत्या. त्याचवेळी दोन महिला आणि चार पुरुष अशी सहा जणांची टोळी तिथे आली. यापैकी एकाच्या हातात गावठी पिस्तूल होतं. या सर्वांनी गरबा खेळत असलेल्या तरुणींपैकी चंदा नावाच्या एका महिलेला घेरलं. त्यांनी तिला पकडून फरफटत बाहेर नेलं.
नेमकी घटना काय?
दरम्यान, काही महिलांनी चंदाला वाचवण्यासाठी अपहरणकर्त्यांची वाट अडवली. परंतु, त्यांनी या महिलांना धक्का दिला तर काही तरुणींवर गावठी पिस्तूल रोखून तिथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विनोद मीना यांनी तातडीने पोलिसांची दोन पथकं चंदाचा शोध घेण्यासाठी रवाना केली. पोलिसांनी आसपासच्या परिसरात नाकेबंदी करून अवघ्या दोन तासात चंदाला शोधून काढलं. पोलिसांनी चंदाचं अपहरण करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
विवाहबाह्य संबंधाचं प्रकरण?
या घटनेच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे की या महिलेचं आधीच लग्न झालेलं असताना ती तिच्या पतीला सोडून दुसऱ्याच पुरुषाबरोबर मंदसौरमध्ये राहत होती. त्यामुळे चंदाच्या माहेरचे आणि सासरचे लोक संतापले होते. या सर्वांनी मिळून त्याच्या अपहरणाचा कट रचला होता.
पोलीस अधीक्षक म्हणाले, “महिला आणि मुलींच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राथमिकता देत आहोत. अशा प्रकारच्या घटना आम्ही कुठल्याही परिस्थितीत सहन करू शकत नाही. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने या महिलेची सुटका केली आहे.”