मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आवाज बदलल्या जाणाऱ्या ॲपचा वापर करून काही मजूरांनी शासकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती मिळविण्याचे आमिष दाखविले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रिजेश प्रजापती, त्याचे सहकारी राहुल प्रजापती, संदीप प्रजापती, लवकुश प्रजापती या चार लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी ब्रिजेश प्रजापती हा मजूर आहे. त्याने युट्यूबवरून आवाज बदलण्याच्या ॲपबद्दल माहिती मिळवली. या ॲपच्या माध्यमातून तो महाविद्यालयातील विद्यार्थीनींना जाळ्यात ओढत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या सासरी मडवास या गावात राहून आरोपीने हा गुन्हा केला.

या टोळक्यातील एक आरोपी त्याच महाविद्यालयात काही काळापूर्वी शिकत होता. तो महाविद्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून मुलींचे नंबर काढून मुख्य आरोपी ब्रिजेशला देत होता. आवाज बदलण्याच्या ॲपचा वापर करून सीधी जिल्ह्यातील संजय गांधी महाविद्यालयाच्या उच्चपदस्थ रंजना मॅडम यांच्या आवाजात विद्यार्थीनींना फोन केला जायचा. विद्यार्थीनींचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना शिष्यवृत्तीचे आमिष दाखविले जायचे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थीनींना त्यांच्या कागदपत्राची पूर्तता करण्यास सांगितले जाई. यासाठी आपल्या मुलाच्या मित्राला कागदपत्र घ्यायला पाठवते, असे रंजना मॅडमच्या आवाजात आरोपी सांगायचे. ठरलेल्या ठिकाणी विद्यार्थीनी आल्यानंतर तिला मोटारसायकलवर बसून निर्जन स्थळी नेले जायचे. तिथे आरोपी विद्यार्थीनीवर बलात्कार करायचे.

सीधी जिल्ह्यातील मझोली पोलीस ठाण्यात एकेदिवशी महिलेचा निनावी फोन आला आणि या गुन्ह्याचा भांडाफोड झाला. महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचला आणि मोठ्या शिताफीने आरोपींना जेरबंद केलं. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी सात विद्यार्थीनींवर बलात्कार केला असल्याची कबुली दिली. आता या प्रकरणात एक-एक करून विद्यार्थीनी पुढे येत आहेत. त्यांनी चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.

प्रकरण उजेडात आल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला केला. “शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून सात आदिवासी विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना अत्यंत व्यथित करणारी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आणखी काही मुली बळी पडल्याची शक्यता असू शकते. याच सीधी जिल्ह्यातील एका आदिवासी व्यक्तीवर भाजपाच्या पदाधिकाऱ्याने लघवी केली होती, हे देश अजून विसरलेला नाही. ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ या घोषणेला काय अर्थ उरतो?”, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सरकारवर टीका केली.