Mahakumbh 2025 Stampede : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित केलेल्या महाकुंभ मेळ्याला आज गालबोट लागले. मौनी अमावस्येनिमित्त जमलेल्या भाविकांमुळे संगम घाटावर चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमी वा मृतांची संख्या अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आलेली नसली तरीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेत भाविक गंभीर जखमी झाले असल्याचं म्हटलं आहे. या घटनेत किती मृत्यू झाले त्याची माहिती अद्याप समोर यायची आहे. दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी या चेंगराचेंगरी सदृश परिस्थितीच्या घटनेचे धक्कादायक अनुभव सांगितले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनय कुमार नावाच्या भाविकाने काय सांगितलं?

विनय कुमार नावाच्या भाविकाने सांगितलं, “चेंगराचेंगरीला सुरुवात झाली तेव्हा मी तिथेच होतो. या ठिकाणी कुठलाही पोलीस बंदोबस्त वगैरे नव्हता. गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमावर आजच्या तिथीला स्नान करण्याचं अध्यात्मिक महत्व आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी गर्दी झाली होती. गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली आणि सगळं चित्रच बदलून गेलं. या ठिकाणी एकच हलकल्लोळ माजला. आणखी एका भाविकाने सांगितलं, “आम्ही रात्री १२.३० च्या सुमारास या ठिकाणी आलो. त्यावेळी गेट खुली होती. गर्दी इतकी वाढली होती की चेंगराचेंगरी झाली. यातून कसे बाहेर पडलो आमचं आम्हालाच माहीत.”

बिहारमधल्या भाविकाने काय सांगितलं?

बिहारमधल्या औरंगाबाद या ठिकाणाहून आम्ही १२ ते १३ लोक आलो होतो. आम्ही सगळे एकाच कुटुंबातले आहोत. त्यामुळे स्नान करण्यासाठी आलो होतो. मात्र या ठिकाणी आम्हाला धक्काबुक्की झाली. चेंगराचेंगरी सुरु झाली आम्ही कसेबसे बाहेर पडलो. सरोजिनी नावाच्या महिलेने सांगितलं, ती आणि तिचं कुटुंब गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न बराच वेळ करत होतं. पण गर्दी इतकी होती की मुंगी शिरायला जागा नव्हती. कुंभमेळा परिसरात फिरताना अचानक गर्दी झाली. आम्ही पळण्याचा प्रयत्नही केला पण जागाच नव्हती. अनेक लोक जखमी झाले आहेत, काय काय घडलं नेमकं आम्हालाही सांगता येणार नाही. आम्ही सगळ्या ६० जणी आलो होतो होतो. त्यापैकी ९ जणींचा आमचा ग्रुप होता. आमच्यापैकी अनेक जण जखमी झाल्या आहेत असं या महिलेने पीटीआयला सांगितलं.

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर स्थिती काय? (Indian Express)

सुलतानपूर येथील भाविकाने काय सांगितलं?

सुलतानपूर या ठिकाणाहून आम्ही आलो आहोत असं बसदेव शर्मा यांनी सांगितलं. मात्र शाही स्नानाच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली, या दरम्यान आमच्याकडचे पैसे चोरीला गेले. प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. असंही शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. तसंच माझ्या कुटुंबातला एक जण त्या चेंगराचेंगरीत सापडून जखमी झाला असंही त्यांनी सागितलं. लोक फक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करत होते, त्यांना कुणी अडवतही नव्हतं अशीही माहिती शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

किशोर कुमार साहू यांची पत्नी हरवली

किशोर कुमार साहू यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, आमच्या कुटुंबातले दहा लोक शाही स्नान करण्यासाठी आलो होतो. पवित्र स्नान करण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. आम्ही दुपारी स्नान केलं आणि रात्री पुन्हा एकदा डुबकी मारावी म्हणून गेलो होतो. त्यावेळी माझी पत्नी पाण्यात उतरायचं म्हणून कपडे बदलण्यासाठी गेली होती. त्यावेळी मी तिला शेवटचं पाहिलं त्यानंतर ती मला दिसलेली नाही. आता किशोर कुमार साहू हे त्यांच्या हरवलेल्या पत्नीचा शोध घेत आहेत. त्यांच्या हातात तिचं आधार कार्ड आहे. माझी पत्नी हरवल्याची तक्रार मी चार ठिकाणी केली. मात्र फारसा काही उपयोग झाला नाही. या ठिकाणी कुणीही कुणाला मदत करताना दिसून येत नाही. असंही साहू यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh 2025 stampede people just walked over her no one even stopped eyewitnesses recount scenes after stampede at maha kumbh scj