Mahakumbh 2025 Stampede : उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या कर्नाटक येथील एका महिलेने मृत्यूच्या जेमतेम तासभर आधी कुंभमेळ्यात झालेल्या तुफान गर्दीबद्दल माहिती देणारा व्हिडीओ बनवला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आम्ही महाकुंभमेळ्यात आहोत, आणि येथे खूप जास्त गर्दी झाली आहे. जे येथे येण्याचा विचार करत आहेत त्यांनी कृपया शक्य असल्यास टाळावे, आणि जर येत असाल तर काळजी स्वतःची घ्या आणि एकमेकांचे हात धरून ठेवा”, असे मेघा हत्तरवट (२४) या यांनी चेंगराचेंगरीच्या काही तास आधी बुधवारी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं.

मेघा हत्तरवात यांच्याबरोबर भाजपाच्या कार्यकर्त्या ज्योती हत्तरवट (५०), अरूण नारायण खोपर्डे (६०) आणि महादेवी हनुमंत बावनूर(४५) हे कर्नाटकातून आलेले तिघे चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडले. हे सर्व जण बेळगावी जिल्ह्यातील होते.

बेळगावी जिल्ह्यातून १३ भाविकांचा गट साई ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून महाकुंभमेळ्यात आला होता.

मेघा हत्तरवटचे वडील दीपक हत्तरवत यांनी सांगितलं की, “२६ जानेवारी रोजी ते महाकुंभासाठी निघाले होते. मी तिला महाकुंभला जाऊ नकोस असं सांगितलं पण ती (मेघा हत्तरवट) तिथे जाण्यावर ठाम होती. आम्ही तिच्या लग्नाचे विचार करत होतो आणि त्याबद्दल बोलणी चालू होती. मगाकुंभ १४४ वर्षांतून एकदाच होते आणि तिच्या लग्नानंतर तिला प्रवास करता येईल की नाही हे सांगता येणार नाही, असं म्हणून तिने मला पटवून दिले.”

मेघा हत्तरवटबरोबर प्रवास करणारे चंद्रकांत पाटील यांनी नंतर दीपक हत्तरवट यांना कळवलं की, ते त्यांची पत्नी आणि मुलीचा शोध घेत आहेत. “बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास मला त्यांचा मृत्यू झाल्याचं कळलं. मी आता काय करावं आणि कोणासाठी जगावं?”, अशा शब्दात कर्नाटक राज्य पाटबंधारे विभागामध्ये काम करणारे दीपक हत्तरवट यांनी आपलं दुखः व्यक्त केलं. दीपक यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं असून ते त्यांची पत्नी आणि लहान मुलगी यांच्याबरोबर राहत होते.

अश्विनी अर्जुन रानडे या देखील बेळगावीमधून आलेल्या भाविकांच्या गटात होत्या. त्यांन एका व्हिडिओमध्ये सांगितलं की, “त्यांनी (टूर ऑपरेटर) आम्हाला सांगितले की आम्ही एकटे स्वत: स्नानाला जाऊ शकतो आणि दुपारी दोन वाजता वाहनाजवळ पुन्हा एकत्र गोळा व्हा.… टूर ऑपरेटर्सनी त्यांचे वाहन स्नानाच्या ठिकाणापासून ३० ते ४० किमी अंतरावर उभे केले होते. इथून आम्ही सर्वजण वेगवेगळ्या वाहनांनी कुंभस्नानाच्या ठिकाणी पोहोचलो. चेंगराचेंगरीत काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला.”

दुसऱ्या मृत महादेवी हनुमंत बावनूर यांच्या मुलाने सांगितले की, बुधवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास त्यांना एका सहप्रवाशाचा फोन आला आणि त्यांची आई बेपत्ता असल्याची माहिती दिली.

“मी माझ्या आईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण उत्तर मिळालं नाही. आम्ही काळजीत पडलो होतो… तिने शेवटचा फोन मध्यरात्रीच्या सुमारास केला होता पण तो नेटवर्क बोलणं झालं नाही. दुपारी एकच्या सुमारास (बुधवारी) आम्हाला आईचा मृत्यू झाल्याचे समजले,” असेही तो म्हणाला.

मृत्यू झालेल्यांपैकी दोघांचे मृतदेह बेळगाव विमानतळावर पोहचले असून ते त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहेत. तर उरलेल्या दोघांचे मृतदेह गोवा विमानतळावर पोहचले आहेत आणि विमानतळावरून रोडने बेळगावी येथे मध्यरात्री पोहचतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh stampede karnataka woman requested people to avoid visiting mahakumbh hour before death rak