पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी किमती भेटवस्तू घेतल्याच्या’ आरोपांना उत्तर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा गुरुवारी नीतिमत्ता समितीसमोर हजर झाल्या. मात्र, समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार विनोदकुमार सोनकर यांनी ‘अनैतिक आणि वैयक्तिक’ प्रश्न विचारल्याचा आरोप करत त्या बैठकीतून बाहेर पडल्या. त्यांच्याबरोबर विरोधी पक्षाचे काही सदस्यही बैठकीतून बाहेर पडले.व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्या वतीने प्रश्न विचारण्यासाठी लाच स्वीकारली असा आरोप भाजपचे खासदार  निशिकांत दुबे यांनी केला आहे.

समितीचे अध्यक्ष विनोदकुमार सोनकर यांनी मोइत्रा आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांचे आरोप फेटाळले. उलट विरोधी पक्षाचे सदस्य अनैतिकरीत्या वागले आणि मोइत्रा यांच्यावरील आरोपांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच बैठकीवर बहिष्कार टाकला असा प्रत्यारोप त्यांनी केला. तर, मोइत्रा यांनी माझ्याविरुद्ध चुकीचे कथन निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा दावा भाजपचे खासदार आणि तक्रारदार निशिकांत दुबे यांनी केला. समितीचे अध्यक्ष ओबीसी असल्यामुळे विरोधी पक्षाचे सदस्य अस्वस्थ असल्याचा आरोपही त्यांनी केला.काँग्रेसचे सदस्य एन उत्तम कुमार रेड्डी यांनी सांगितले की, समितीच्या अध्यक्षांनी मोइत्रा यांना विचारलेले प्रश्न असभ्य आणि अनैतिक होते असे विरोधी पक्षाच्या सदस्यांना आढळले. तसेच ज्या पद्धतीने या बैठकीचे कामकाज चालले त्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. अध्यक्षांच्या कथित आक्षेपार्ह प्रश्नांना विरोध दर्शवल्यानंतरही या समितीने कामकाज सुरूच ठेवले.

हेही वाचा >>>पत्नीने आयब्रोज केल्याने सौदीत बसलेला पती भडकला! व्हिडीओ कॉलवरच दिला तलाक

अ‍ॅड. जय अनंत देहादराय यांच्याबरोबर वैयक्तिक नाते संपुष्टात आल्यानंतर त्यांनी द्वेषबुद्धीने आपल्याविरोधात आरोप केल्याचे मोइत्रा यांनी समितीला सांगितले. रेड्डी आणि बसपचे दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या काही सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला. तर भाजपच्या व्ही डी शर्मा यांच्यासह काही खासदारांनी मोइत्रा यांनी आरोपांना उत्तर द्यावे आणि देहादराय यांच्याबरोबरचे नाते संपुष्टात आल्याचा याच्याशी संबंध जोडू नये अशी मागणी केली.मोइत्रा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांना संसदेचे लॉगइन आयडी आणि पासवर्ड दिल्याचे मान्य केले आहे, पण पैसे घेतल्याचे नाकारले.दुबे यांनी १५ ऑक्टोबरला सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केला. त्यानंतर हिरानंदानी यांनी १९ ऑक्टोबरला नीतिमत्ता समितीसमोर प्रतिज्ञापत्र दाखल करून आपल्याला प्रश्न पोस्ट करण्यासाठी संसदेचे लॉगइन आयडी आणि पासवर्ड दिले होते असे सांगितले. अ‍ॅड. देहादराय यांनी मोइत्रांविरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे.

मोइत्रा यांची मागणी

मोइत्रा यांनी नीतिमत्ता समितीला लिहिलेल्या पत्रामध्ये स्वत:वरील आरोप फेटाळले आहेत, तसेच कथित लाच देणारे हिरानंदानी आणि तक्रारदार अ‍ॅड. देहादराय यांची उलटतपासणी घेण्याची परवानगी मागितली आहे.विरोधी सदस्यांनी समितीचे कामकाज व माझ्याविरोधात आक्षेपार्ह शब्दप्रयोग वापरले. – विनोदकुमार सोनकर, नीतिमत्ता समितीचे अध्यक्ष

मी सादर केलेल्या पुराव्यांनंतर मोइत्रा यांना कोणतीही शक्ती वाचवू शकत नाही. – निशिकांत दुबे, भाजप खासदार समितीच्या अध्यक्षांनी मोइत्रा

यांना विचारलेले प्रश्न असभ्य आणि अनैतिक होते असे विरोधी पक्षाच्या सदस्यांना आढळले. – एन उत्तम कुमार रेड्डी, नीतिमत्ता समितीचे सदस्य

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahua moitra boycotted the inquiry and accused the ethics committee chairman of asking objectionable questions amy